आम्हीं दहा जागा जिंकणार :भाजप
सांखळी : सांखळी नगरपालिका क्षेत्रातील दहाही प्रभागांमध्ये भाजपने दिलेल्या सर्व उमेदवारांचा प्रचार पद्धतशीर व प्रभावीपणे झालेला असून या नगरपालिकेतील सर्व दहाही उमेदवार हे विजयी ठरणार आहेत. भाजप पक्ष आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावरील विश्वास सार्थ ठरवतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. या नगरपालिका निवडणुकीत रिंगणात असलेल्या विरोधी उमेदवारांकडून होत असलेल्या दडपशाही व दबावाचे राजकारण या आरोपांचे यावेळी सदानंद शेट तनावडे यांनी खंडन केले. विरोधात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आपला पराजय स्पष्टपणे दिसू लागल्याने त्यांनी भाजपवर नाहक दडपशाही व दबावाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री बनल्यानंतर संपूर्ण गोव्यात संपादन केलेली ‘सामान्य जनतेचा मुख्यमंत्री’ ही प्रतिमा पाहता, व कधीही कोणावर अन्याय व अत्याचार होऊ नये यासाठी झटत असलेल्या मुख्यमंत्र्याकडून निवडणुकीत तरी अशा प्रकारचे प्रकार घडतील असे वाटत नाही. या नगरपालिका निवडणुकीत जनता भाजपलाच पसंती देऊन ट्रिपल इंजिन सरकार चालवण्याची संधी भाजपला व सांखळीवासियांना देणार आहे, असा विश्वास सदानंद शेट तनावडे यांनी व्यक्त केला.









