भाजपप्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांची माहिती : पंचायती, पालिकांनी ठराव घेण्याचे आवाहन केंद्राला पत्रे, ईमेल पाठवण्याचे जनतेला आवाहन
प्रतिनिधी /पणजी
म्हादईवरील कळसा-भांडुरा धरण प्रकल्पाच्या डीपीआरला मंजुरी मिळाल्याने गोव्यातील पाच तालुके धोक्यात आले असून पाच वन्यजीव अभयारण्यांवरही परिणाम होईल, अशी भीती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या डीपीआरला केंद्राने दिलेली मान्यता मागे घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच ही मागणी अधिक व्यापक रितीने केंद्र सरकारसमोर मांडण्यासाठी राज्यभरात स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मंगळवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी खासदार, प्रदेश सरचिटणीस ऍड. नरेंद्र सावईकर आणि माजी आमदार तथा सरचिटणीस दामू नाईक यांची उपस्थिती होती.
पाच तालुक्यांवर होणार परिणाम
डीपीआरला मंजुरी मिळाल्याने राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. केंद्रीय जल आयोगाचा हा एकतर्फी निर्णय गोव्यासाठी अन्यायकारक असल्याची प्रत्येकाची भावना बनली आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका सत्तरी तालुक्याला बसणार असून त्यापाठोपाठ डिचोली, बार्देश, तिसवाडी आणि पेडणे या तालुक्यांवरही जबरदस्त प्रभाव पडणार आहे, असे ते म्हणाले.
विविधमार्गाने गोव्याची बाजू मांडणार
आम्हाला गोव्याचे हित, अस्मिता कायमस्वरुपी राखून ठेवायची आहे. त्यादृष्टीने सोमवारी झालेल्या भाजपच्या प्रदेश पदाधिकारी आणि कोअर कमिटीच्या बैठकीत सखोल उहापोह करण्यात आला. त्यावेळी सदर प्रश्न ई-मेल, पत्रे, स्वाक्षरी मोहीम यासारख्या विविध माध्यमातून केंद्र सरकारकडे मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यभरातील पंचायती, पालिका यांनीही केंद्राच्या निर्णयाविरोधात ठराव घ्यावे, सह्यांच्या मोहीमेत सहभागी व्हावे, पंतप्रधानांना पत्रे लिहावी, ईमेल पाठवावे, असे आवाहन तानावडे यांनी केले.
डीपीआर मागे घेण्याची मागणी
आम्ही हा ठराव पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे मांडणार आहोत. जोपर्यंत प्रलंबित प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालय आदेश देत नाही तोपर्यंत पाणी वळवण्याबाबत कोणतीही कारवाई करू नये, असा ठराव घेतला असून वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत वन्यजीव अभयारण्यांमधून पाणी पळवल्याबद्दल कर्नाटकला नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच डीपीआरला दिलेली मान्यता मागे घेण्याचीही मागणी करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
विरोधकांची अनुपस्थिती दुःखद
म्हादई हा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा विषय नसून संपूर्ण राज्याच्या हिताचा, अस्मितेचा आणि आमच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. त्यामुळे सोमवारी जेव्हा मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीचे आवाहन केले होते त्यामागे राज्यहित हाच हेतू होता. तरीही काँग्रेस, आप, आरजी, गोवा फॉरवर्ड यांच्यापैकी एकही विरोधक या बैठकीला उपस्थित राहिला नाही. हे खरोखरच खेदजनक आहे, अशी टीका तानावडे यांनी केली. त्यांनी उपस्थित राहून आपले प्रश्न, मते मांडायला हवी होती. याच विषयावर कर्नाटकातील आमदार आणि तमाम जनता सत्ताधारी, विरोधक असा भेदभाव न करता सर्वजण एकत्र येतात. तो विषय आपल्या स्वाभिमानाचा बनवतात. गोव्यात मात्र असे चित्र दिसत नाही. लोकांनी या विषयावर एकत्र आले पाहिजेत, असे आवाहन तानावडे यांनी केले.









