जानेवारीमध्ये महाराष्ट्रासह सात राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलणार : 15 जानेवारीपर्यंत बहुतांश राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजपमध्ये लवकरच संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल होणार आहेत. नवीन वर्षात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पक्षाला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळू शकतो. मात्र, पक्षाच्या घटनेनुसार, त्यापूर्वी 50 टक्के राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका पूर्ण कराव्या लागतात. त्यानुसार मध्यप्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्येही 15 जानेवारीपर्यंत प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार आहेत.
संघटनात्मक निवडणुकांसंदर्भात रविवारी दिल्लीत पक्षाची बैठक झाली. या बैठकीत राज्यांतर्गत निवडणुकांवर चर्चा करण्यात आली. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा , संघटनेचे सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्याशिवाय सर्व राष्ट्रीय सरचिटणीस आणि संघटना निवडणूक प्रभारी व सहप्रभारी उपस्थित होते. याशिवाय राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, संघटना मंत्री आणि निवडणूक अधिकारीही बैठकीला उपस्थित होते.
जे. पी. नड्डा यांना जून 2019 मध्ये पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आणि जानेवारी 2020 मध्ये पूर्णवेळ अध्यक्ष बनवण्यात आले होते. भाजपमध्ये पक्षाध्यक्षाचा कार्यकाळ 3 वर्षांचा असतो. त्यानुसार जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ 2023 मध्ये संपला आहे. मात्र, देशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता. भाजपच्या घटनेनुसार एखादी व्यक्ती जास्तीत जास्त दोन टर्म सतत अध्यक्ष राहू शकते. मात्र, आता नड्डा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केल्यामुळे ते पुन्हा अध्यक्ष होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. भाजपचा ‘एक व्यक्ती-एक पद’ नियमावलीची अंमलबजावणीही सुरू आहे.









