विटा :
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका भाजपा स्वबळावर लढवणार आहे. 2029 ची निवडणूक अजून लांब आहे. तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून जाणार आहे. विटा नगरपालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या चिन्हावर आपल्याला जिंकायचे आहे. त्यासाठी कामाला लागा, असे आवाहन आमदार गोपिचंद पडळकर यांनी केले.
विट्यात भाजपचा पदाधिकारी संवाद मेळावा झाला. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार पडळकर म्हणाले, विधानसभेनंतर काहीजण अजून हवेत आहेत. परंतु जनता कोणाला बांधील नसते. खानापूर तालुक्यात लोकं गुलामगिरीच्या जोखडात आहेत. त्यांना मुक्त करायचं आहे. या तालुक्यात पंचायत समितीत 18-20 वर्षे झाले तरी तेच अधिकारी तळ ठोकून आहेत. ते नेत्यांची कामे करतात लोकांची नाही. अशा लोकांना वठणीवर आणलं पाहिजे. सामान्य लोकांसाठी काम करा, असा इशारा त्यांनी दिला.
मंत्री नितेश राणे यांनी तलावात, धरणात अगर समुद्राच्या पाण्यातल्या मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला आहे. जे शेतकऱ्याला मिळणार ते मत्स्य व्यवसायिकाला मिळणार. शेततळ्या मध्येही मत्स्य व्यवसाय करणारांनाही तो लाभ मिळावा, अशी मागणी आपण केली आहे. जत मतदारसंघांमध्ये चार हजार शेततळी आहेत. याबाबतचा चाचणी प्रकल्प राज्य सरकारने जत तालुक्यात सुरू करावा, अशी आपण मागणी केली आहे, याबाबत उद्या म्हणजे सोमवारीच बैठक आहे.
जत सारख्या दुष्काळी भागात आम्ही बोटिंगच्या स्पर्धा घेतोय, शक्य होतं का? कधी ऐकलं होतं का? पण आता ते घडतंय. अख्ख्या महाराष्ट्रातील पोरं तिथं बोटी घेऊन जतमध्ये येत आहेत. त्यानंतर खानापूर मतदारसंघातही देशातली बोटिंगची स्पर्धा राजेवाडी तलावात घ्यायची आहे. दुष्काळी म्हणून राहणं आता बंद झालं पाहिजे, असेही आमदार पडळकर यावेळी म्हणाले.
- खडकाळ जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्प
राज्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये खडकाळ जमिनींत काही पिकत नाही, अशा शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे योजना मांडली आहे. खडकाळ जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प बसवू, त्यातून या सगळ्या भागात सौरऊर्जेची शेती होईल, शेतकऱ्यांना भाडेपट्टा मिळेल. अशी एक हजार एकर जमीन आपण शासनाला देऊ, असेही आमदार पडळकर म्हणाले.
- विद्यापीठ उपकेंद्र तातडीने सुरू करा
खानापुरात शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्याबाबत आपण कुलगुरूंशी बोललो आहे. जलसंपदा विभागाची इमारत भाड्याने घेऊन तेथे तात्काळ उपकेंद्राचे कामकाज सुरू करा. प्रस्तावित जागेत नवीन इमारतींचा प्रस्ताव सादर करा, मी लगेच मंजूर करून घेतो. श्रेय कुणीही घ्या, काम झालं पाहिजे.
- खानापुरात भाजप मजबूतच
माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर म्हणाले, भाजपचे खानापूर तालुक्यातील संघटन चांगले आहे. दोघाचौघाच्या जाण्याने पक्षावर परिणाम होत नसतो. आम्ही म्हणजे पक्ष असे होत नाही. पक्ष संघटना मजबूत असल्याचे आजच्या मेळाव्यातून दिसून आले आहे. तुम्ही एकजूटीने कामाला लागा, भाजपमध्ये कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल, असेही पडळकर म्हणाले.








