Udayanraje Bhosale Satara News : पूर्वीच्या काळात देशात राजेशाही होती.आता लोकशाही आहे. या लोकशाहीत काँग्रेसने गेली 70 वर्ष विकासापासून वंचित ठेवले आहे.देशाचे वाटोळे केले आहे.महात्मा गांधींनी सत्ता विकेंद्रीकरण करा असा संदेश दिला होता.परंतु तो संदेश फक्त एका कुटुंबापुरता मर्यादीत ठेवण्याचे काम काँग्रेसने केले आहे, असा घणाघाती आरोप भाजप खासदार उदयनराजे यांनी केले.दरम्यान,त्यांनी 2024 च्या निवडणुकांमध्ये भाजपा,शिंदे गट आणि अजितदादा मिळून विधानसभेला 288 जागा आणि लोकसभेला 48 जागा मिळवू,असा दावा त्यांनी करत नेहमीच्या स्टाईलने कॉलर उडवली.
सातारा तालुक्यातील वर्ये येथील विठ्ठल मंगलम् येथे भाजपने टिफीन बैठकीचे आयोजन केले होते.या बैठकीत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रम पावस्कर,मनोज घोरपडे,धैर्यशील कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार उदयनराजे म्हणाले,भाजपाने बोलवलेल्या टिफीन बैठकीचे महत्व हे आहे की, आपण एकत्र आलो पाहिजे.आपल्यात एकी असली पाहिजे.आज देशात अनेक पक्ष आहेत.परंतु भाजपा वगळता एकाही पक्षात एकी नाही.पूर्वी देशात राजेशाही होती.आता लोकशाही आहे.काँग्रेसमध्ये आजही घराणेशाही आहे.ज्या महात्मा गांधींनी देशात सत्ता विकेंद्रीकरण झाल्याशिवाय तळागाळातल्या माणसाचा विकास होणार नाही असे सांगितले होते. त्याला मुठमाती देण्याचे काम काँग्रेसने केल्याची टीका उदयनराजेंनी केली.








