प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur Market Committee Election : राज्याच्या राजकारणात कट्टर शत्रु बनलेले भाजप-शिवसेना आणि ठाकरे गटाने कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मात्र हात मिळवणी केली आहे. राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर आणि आरपीआयचे उत्तम कांबळे यांना सोबत घेत त्यांनी शिवशाहू शेतकरी परिवर्तन आघाडीची घोषणा केली आहे. गुरुवारी शासकीय विश्रामगृह आणि भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या नागाळा पार्क येथील कार्यालयात जागा वाटपा संदर्भात झालेल्या पाच ते सहा तासांच्या चर्चेनंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणुक प्रक्रीया सुरु असून गुरुवारी माघारीचा अंतिम दिवस होता. बुधवारी काँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्य पक्षाने शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक आणि आमदार प्रकाश आबिटकर यांना सोबत घेत राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीची स्थापना करत उमेदवार जाहीर केले. यावेळी जागावाटपावर एकमत न झाल्याने ठाकरे गटाला विचारात न घेताच काँग्रेस-राष्ट्रवादीने पॅनेल जाहीर केले. यानंतर ठाकरे गटाने उर्वरीत पक्षांना सोबत घेवून मोट बांधण्याचा प्रयत्न केला.
त्यानुसार गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासूनच भाजप, शिवसेना शिंदे गट- ठाकरे गटाकडून पॅनेल बांधणीच्या हालचाली सुरु झाल्या. प्रथम सकाळी दहा वाजता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना शिंदे गट-ठाकरे गट, शेतकरी संघटना, राष्ट्रवादी, आरपीआय (आठवले गट) यांच्यामध्ये जागा वाटपा संदर्भात चर्चा झाली. येथील चर्चेनंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हे सर्व नेते भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या नागाळा पार्क येथील कार्यालयात आहे. येथेही सुमारे दोन तास चर्चा झाली. प्रदीर्घ चर्चेनंतर शिव-शाहू शेतकरी परिवर्तन आघाडीची घोषणा करण्यात आली. यामध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला प्रत्येकी सहा, ठाकरे गटाला चार आणि राष्ट्रवादी व आरपीआयला प्रत्येकी एक जागा देण्यात आली.
शेतकरी संघटना पडल्या बाहेर
गुरुवारी सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष भाजप, शिवसेना, ठाकरे गटासोबत होत्या. मात्र स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर बाजार समितीवर लक्ष केंद्रीत केले असल्याने त्यांनी या आघाडीमध्ये उमेदवार दिला नाही. शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकरी संघटना अपेक्षित जागा न मिळाल्याने आघाडीमधून बाहेर पडल्या. पुढील दोन दिवसात संघटनांचे वरीष्ठ नेते निवडणुकीत कोणाला पाठींबा द्यायचा हे जाहीर करतील असे कार्यकर्त्यांनी सांगितले.
आमदार कोरेंना नरके, पाटील, आसुर्लेकरांची अॅलर्जी
आमदार विनय कोरे यांना चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर या नावांची अॅलर्जी आहे. कोरेंना सोबत घेण्यासाठी जिल्हा बँक निवडणुकीप्रमाणे बाजार समितीमध्येही आम्हाला डावलण्यात आले. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारातील निवडणुकाही शिव-शाहू परिवर्तन आघाडीच्या माध्यमातूनच लढवूया असा प्रस्ताव माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी नेत्यांच्या समोर ठेवला.
आमदार मुश्रीफांकडून सोयीचे राजकारण
आमदार हसन मुश्रीफ यांनी जागा वाटपा दरम्यान शिवसेना ठाकरे गटाची जागा थेट माजी आमदार संजयबाबा घाटगे यांना जाहीर केली. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या अन्य नेत्यांचे म्हणणे जाणून घेतले नाही. आमदार मुश्रीफ यांनी त्यांच्या सोयीचे राजकारण पाहत माजी आमदार घाटगे यांना जागा जाहीर केल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी यांनी केला.

परिवर्तन आघाडीमध्ये हे नेते आले एकत्र
शिवशाहू शेतकरी परिवर्तन आघाडीमध्ये खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील-सरुडकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, प्रा. जयंत पाटील, शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, शहराध्यक्ष सुनील मोदी, भाजपचे नाथाजी पाटील, राहूल देसाई, प्रा. सुनील मगदूम, प्रा. शहाजी कांबळे, हंबीरराव पाटील, संभाजी आरडे आदी नेते एकत्र आले आहेत.
शिव-शाहू शेतकरी परिवर्तन आघाडीचे उमेदवार पुढीलप्रमाणे :
विकास सेवा संस्था गट : रणजीत वसंतराव पाटील चुये ता. करवीर, बाजीराव सदाशिव पाटील वडणगे ता. करवीर, किरण गोविंद पाटील महे ता. करवीर, सुरेश आनंदा पोवार सातार्डे ता. पन्हाळा, अर्जुन महादेव चौगुले पोर्ले ता. पन्हाळा, प्रताप भैरु मेंगाणे बामणे ता.भुदरगड, बळवंत सदाशिव पाटील चंद्रे ता.राधानगरी. महिला प्रतिनिधी : कविता शाहू चव्हाण दऱ्याचे वडगाव, अरुणा अशोक पाटील पाडळी बुद्रुक ता.करवीर. इतर मागासवर्ग : अनिल श्रीकृष्ण वायकुळ आंबा शाहूवाडी, भटक्या विमुक्त जाती : मधुकर गणपती पाटील मोरेवाडी ता.भुदरगड. ग्रामपंचायत सदस्य गट: संजय दत्तात्रय जाधव हणमंतवाडी ता. करवीर, सुरेश शामराव पाटील पिरळे ता. शाहूवाडी, समाधान नारायण म्हातुगडे सोनाळी ता. कागल, उत्तम रामचंद्र कांबळे गोरंबे ता. कागल अडते व व्यापारी गट : नंदकुमार आनंदराव वळंजू कोल्हापूर, अमर विलासराव क्षीरसागर कोल्हापूर. हमाल व तोलाईदार : राजाराम आबाजी जगताप कुराडवाडी ता.पन्हाळा.









