आमदार व्हेंझी व्हिएगश यांचा आरोप : वाळूचे ढिगारे हटवून रस्ता करण्याच्या कामाचा पर्दाफाश
मडगाव : बाणावलीतील आपचे आमदार कॅप्टन व्हेंझी व्हिएगस यांनी झालोर-फात्राडे सीमेवर वॉरन आलेमाव यांच्या मालकीच्या जेसीबीद्वारे बेकायदेशीररित्या नैसर्गिक वाळूचे ढिगारे हटवून रस्ता करण्याच्या कामाचा पर्दाफाश केला आहे. सदर काम कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय सुरु होते. याची माहिती मिळताच जेव्हा आप कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलिसांना बोलावले. त्यावेळी आलेमाव कुटुंबाशी संबंधित गुंडांनी आक्रमकपणे त्यांच्यावर हल्ला केला. असे घडताच आप कार्यकर्त्यांनी ताबडतोब पोलिस महासंचालक, जिल्हाधिकारी, मामलेदार आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तो जेसीबी बाणावली सीमेवरुन जाण्यापूर्वी थांबविण्याचे अधिकाऱ्यांना आवाहन केले, असा दावा त्यांनी केला आहे.
या घटनेनंतर जेसीबी जप्त करण्यात आला नाही. सोमवारी तो जेसीबी आम्ही ताब्यात घेऊ, असे आश्वासन पोलिसांनी दिले. मात्र धक्कादायक बाब म्हणजे त्याच रात्री उशिरा जेसीबी सोडण्यात आला. एका वरिष्ठ भाजप नेत्यांच्या सांगण्यावरुनच जेसीबी सोडण्यात आला आहे. यावरून अवैध कामांत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे आणि त्यांना संरक्षण दिले जात असल्याचे सिद्ध झाले आहे, असा आरोप व्हिएगस यांनी केला आहे. आमदार व्हिएगस पुढे म्हणाले की, आम्ही अवैध काम थांबवून प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलावले होते. मात्र त्याच रात्री जेसीबी सोडण्यात आला.
यावरुन भाजप आलेमाव कुटुंबाला पाठिंबा आणि संरक्षण देत असल्याचे सिद्ध होते. आज सोमवारी सकाळी बाणावलीमधील नागरिकांना गोळा करुन आम्ही आमची ताकद दाखवून देऊ. या प्रकरणातील सर्व दोषींना जबाबदार धरले जाईल, असे त्यांनी सांगितले. अवैध कामासाठी वापरलेला जेसीबी आणि अन्य यंत्रसामग्री तत्काळ जप्त करावी, आप स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांवरील हल्ल्याप्रकरणी चौकशी करावी, बेकायदेशीररित्या वाळूचे ढिगारे उद्ध्वस्त केल्याप्रकरणी जबाबदार असलेल्यांवर तत्काळ कारवाई करावी, ज्यामध्ये जमीनमालक, मशिन ऑपरेटर आणि मदत करणाऱ्या अधिकाऱ्याचा समावेश होतो, अशा मागण्या ‘आप’ने केल्या आहेत.
आजच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
दरम्यान, आमदार व्हिएगस यांनी आज सोमवारी सकाळी 11.30 वा. झालोर-फात्राडे येथे शांततापूर्ण आंदोलन करुन सुरू असलेल्या अवैध कामाबाबत न्याय मागण्यासाठी नागरिकांना एकत्र जमण्याचे आवाहन केले आहे.









