गडहिंग्लजला भाजपाची सभा
गडहिंग्लज प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची शिवसेना संपली असून त्यांची आता ‘क्षीण’ सेना झाल्याचा आरोप करत खासदार शरद पवार यांचा राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोडल्यानंतर राज्यभर खासदार पवार शिल्लक माणसे शोधण्यासाठी फिरत आहेत असा हल्लाबोल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गडहिंग्लज येथील नेहरु चौकात शनिवारी झालेल्या जाहीर सभेत केला आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे शनिवारी गडहिंग्लजच्या दौऱ्यावर आले होते. सकाळी मंत्री हॉलमध्ये सुपर वॉरियर्सचा मेळावा घेत 2024 च्या निवडणूकीत पंतप्रधान मोदींना निवडून आणण्यासाठी वारियर्सने घरोघरी जावून केंद्र आणि राज्य सरकारची कामे सांगत प्रबोधन करावे असे आवाहन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करुन ‘घर चलो अभियान’ अंतर्गत काही कुटुंबांना भेटी देत चर्चा केली. त्यानंतर मिरवणूकीने नेहरु चौकातील सभास्थळी आल्यानंतर त्यांनी मार्गदर्शन केले. खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पंतप्रधान मोदी यांनी कलम 370 रद्द केले. राममंदीर उभे करण्यास पुढाकार घेतला. शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना राबवली. गरीबांना मोफत अन्न पुरवठा सुरु केला. महिलांना 33 टक्के आरक्षणाची घोषणा केल्याचे सांगितले. जनतेसाठी विविध योजना राबवणाऱ्या पंतप्रधान मोदी यांना पुन्हा विजयी करण्यासाठी साऱ्यांनी काम करायचे आहे असे आवाहन केले.
राज्यात भाजपाचे सर्वाधिक आमदार निवडून येवूनही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होवू नये यासाठी खासदार शरद पवार यांनी पाठीत खंजीर खुपसून युतीत फुट पाडली. उध्दव ठाकरेंना फोडून मुख्यमंत्री केले. पण खासदार पवार यांना काळाने उत्तर दिले असून त्यांचेच पुतणे अजित पवार यांनी पक्ष सोडला आहे. त्यामुळे माणसे शोधण्याची वेळ पवार यांच्यावर आली आहे. तर सत्तेसाठी हिंदुत्व सोडणाऱ्या ठाकरे यांनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी सोडत बाजूला झाल्याने ठाकरेंची सेनाही ‘क्षीण’ झाल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केला. महाराष्ट्राला क्रमांक 1 वर नेण्यासाठी शिंदे-फडणवीस एक झाल्याचे सांगत मोदींना पाडण्यासाठी 28 पक्ष एकत्र आले आहेत. त्यांच्यातील एक घटक हिंदु संस्कृती संपवण्याची भाषा करत आहेत. पण हिंदू संस्कृती संपवणाऱ्यांना भाजप कार्यकर्ते ‘करंट’ लावल्याशिवाय सोडणार नाहीत असा इशारा दिला. यावेळी शांताबाई यादव यांचा श्री. बावनकुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, शिवाजीराव पाटील, रावसाहेब पाटील, माजी राज्यमंत्री भरमू पाटील, पश्चिम महाराष्ट्र प्रभारी मुरलीधर मोहळ, मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष राहूल देसाई, महामंत्री विक्रांत पाटील, संग्राम कुपेकर, राजेंद्र तारळे, प्रितम कापसे यांच्यासह अन्य उपस्थित होते.
आमच्याही मनात तेच….
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे भाषणाला उभे राहिल्यानंतर समरजितसिंह घाटगे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘बदल हवा तर आमदार नवा’ अशा घोषणा करत फलक उंचावल्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी तुमच्या मनात आहे तेच आमच्याही मनात आहे असे सांगताच पुन्हा जोराच्या घोषणा देण्यात आल्या.








