2 आमदारांनाही घेतले ताब्यात ः राज्यात तणावाचे वातावरण
वृत्तसंस्था / हैदराबाद
तेलंगणा भाजप अध्यक्ष बंदी संजय यांना अटक करण्यात आल्याने राज्यात तणावाचे वातावरण आहे. संजय यांना झालेल्या अटकेच्या कारवाईला भाजपकडून विरोध केला जात आहे. या प्रकरणाचे पडसाद दिल्लीतही उमटले असून संसद परिसरात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत तेलंगणाच्या स्थितीवर चर्चा केली आहे. तेलंगणातील पेपरफुटीप्रकरणाशी संबंधित चौकशीकरता हजर न राहिल्याने बंदी संजय यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.
भाजप प्रदेशाध्यक्ष बंडी संजय हे करीमनगर येथील स्वतःच्या निवासस्थानी असताना मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी तेथे घुसून त्यांना बळजबरीने स्वतःसोबत नेल्याचा आरोप आहे. खासदाराच्या समर्थकांनी पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने तणावाची स्थिती उद्भवली होती. भाजपच्या दोन आमदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तेलंगणा पोलिसांनी बुधवारी भाजप आमदार रघुनंदन राव आणि एटाला राजेंद्र तसेच अन्य नेत्यांना ताब्यात घेतले आहे. रघुनंदन राव यांना यदाद्री भुवनगिरी जिल्हय़ात ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर मध्यरात्री अटक करत त्यांना करीमनगरमध्ये नेण्यात आले. निदर्शकांना रोखण्यासाठी पोलीस स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावर बॅरिकेड्स लावण्यात आले होते.
तणावपूर्ण स्थिती, मोठा बंदोबस्त
भाजप प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात कारवाई झाल्याने पक्षाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येत पोलीस स्थानक परिसरात पोहोचले. तणावपूर्ण स्थिती पाहता पोलीस स्थानकाच्या परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकाबाहेर निदर्शने केली. तसेच पोलीस स्थानकात शिरण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता धक्काबुक्कीचाही प्रकार घडला आहे.
भाजप कार्यकर्त्यांवर लाठीमार
पोलिसांकडून भाजप कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्यात आला. तसेच पोलीस अन् भाजप नेत्यांदरम्यान झटापट झाल्यावर अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. बंदी संजय यांना झालेली अटक अवैध असून त्यांची त्वरित सुटका करण्यात यावी अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. अटक वॉरंट नसताना अटकेची कारवाई कशी झाली असा प्रश्न भाजपकडून विचारला जात आहे. तर कायदा-सुव्यवस्था पाहता अटक वॉरंटशिवाय देखील अटक केली जाऊ शकते असे पोलिसांचे म्हणणे आहे.
तेलंगणात बिहारसदृश स्थिती
संजय यांना अटक करताना तेलंगणा पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशांचे उल्लंघन केले आहे. बीआरएस सरकार तेलंगणात बिहारसारखी अराजकता निर्माण करत असल्याचा आरोप आमदार रघुनंदन यांनी केला आहे. अन्य भाजप आमदार एटाला राजेंद्र यांना हैदराबादच्या शमीरपेटमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले.
घटनाविरोधी कारवाई ः केंद्रीयमंत्री
पोलिसांच्या कारवाईची निंदा करत केंद्रीयमंत्री जी. किशन रेड्डी यांनी कुठलेही कारण न सांगता बंदी संजय यांना ताब्यात घेणे घटनाविरोधी असल्याचे म्हटले आहे. विविध प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच तेलंगणाच्या दौऱयावर येणार आहेत. त्यांच्या दौऱयाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याने तणाव वाढला आहे.
खोटय़ा आरोपात गोवण्याचा प्रकार तेलंगणा पोलिसांनी मध्यरात्री भाजप प्रदेशाध्यक्ष बंदी संजय कुमार यांना अटक केली आहे. माध्यमिक विद्यालयाच्या पेपर लीकप्रकरणात सामील असल्याचा खोटा आरोप करत ही कारवाई करण्यात आली आहे. के. चंद्रशेखर राव यांच्या राजकीय पतनास ही कारवाई कारणीभूत ठरणार असल्याचे विधान भाजप नेते अमित मालवीय यांनी ट्विट करत केले आहे.









