प्रतिनिधी /पणजी
गोवा प्रदेश भाजपतर्फे 4 ते 14 जून या कालावधीत सर्व 40 मतदारसंघातून गरीब कल्याण मेळावे घेण्यात येणार आहेत. त्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे मार्गदर्शन करतील. भाजपचे इतर मंत्री, नेते, आमदारही त्यात सहभागी होणार आहेत.
पावसाळा जवळ येऊन ठेपल्याने हॉलमध्ये 500 ते 1000 जणांचा मेळावा घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत व भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली. केंद्रीय भाजप नेते त्यासाठी येणार असल्याचे सांगण्यात आले.
पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की गेल्या 3 वर्षात केंद्र सरकारकडून 74.69 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून एकूण 21867 आयुष्यमान कार्डे गोव्यात वितरीत करण्यात आली आहेत. त्या अंतर्गत केंद्राने त्या कार्ड धारकांना मिळून एकूण 23 कोटी रुपये निधी वितरीत केला आहे.
प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजना गोव्यात यापूर्वीच लागू करण्यात आली असून त्या अंतर्गत राज्यात 10 केंद्रे सुरू असल्याचे ते म्हणाले. त्या केंद्रातून परवडणाऱया किंमतीत जनतेला महत्त्वाची औषधे पुरवण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
गरीबी कमी करण्याच्या उद्देशाने दीनदयाळ अंत्योदय योजना गोव्यात राबवण्यात येत असून त्याअंतर्गत राज्यात 7 निवाराकेंद्रे उभारण्यात आली आहेत. तेथे गरीबांना अन्न, निवास उपलब्ध करण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला.
पंतप्रधान जन-धन योजनेतून 1,71,050 जणांना लाभ झाल्याची माहिती त्यांनी दिली. मोपा विमानतळ, झुआरी पूल, राष्ट्रीय महामार्ग दुरूस्ती रूंदीकरण, अटल सेतू असे विविध प्रकल्प केंद्राच्या सहाय्याने राज्यात साकारण्यात आल्याचे ते म्हणाले.
राज्याला केंद्राकडून 1291 कोटी जीएसटी परतावा
गोवा राज्याला केंद्र सरकारकडून 1291 कोटी रुपयांचा जीएसटी परतावा मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. ती रक्कम गोव्याच्या व जनतेच्या विकासासाठी उपयोगी पडणार असल्याचे ते म्हणाले. या परतव्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले.
मोपावरील सर्व नोकऱया पेडणेकरानाच : मुख्यमंत्री
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळातील सर्व नोकऱया या पेडणेकरांनाच मिळाल्या असून उर्वरीत नोकऱयाही त्यांनाच मिळतील असा दावा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केला. सुमारे 500 कायम नोकऱया पेडणेकरांना देण्यात आल्या असून आणखी तेवढय़ा नोकऱया पेडणेकरांना देण्यात येतील. माझ्या मतदारसंघातील लोकांना नोकऱया देण्याची माझी सवय नाही. तशा नोकऱया तेथे दिल्याच्या बातम्या चुकीच्या, निराधार, खोटय़ा, अफ्ढवा असल्याचे ते म्हणाले.









