विधानसभा निवडणुकीसाठी आणखी 9 उमेदवारांची घोषणा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. केंद्रीय निवडणूक समितीने मंजूर केलेल्या या यादीमध्ये 9 विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या नऊ जागांपैकी तीन जाग अनुसूचित जाती (एससी) साठी राखीव आहेत. पक्षाने बाबरपूर विधानसभा मतदारसंघातून अनिल वशिष्ठ यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवरून भाजप नुपूर शर्मा यांना उमेदवारी देऊ शकते, असे आधी मानले जात होते. पण सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्या नावाची चर्चा झाली नाही.
भाजपने ग्रेटर कैलाश विधानसभा मतदारसंघातून शिखा राय यांना तिकीट दिले आहे. त्यांचा सामना आम आदमी पक्षाचे उमेदवार आणि मंत्री सौरभ भारद्वाज आणि काँग्रेसचे गरवीत संघवी यांच्याशी होईल. तसेच शाहदरा येथून संजय गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भुवन तंवर दिल्ली कॅन्टमधून लढणार आहेत. याशिवाय पक्षाने संगम विहारमधून चंदन कुमार चौधरी यांना तिकीट दिले आहे. वजीरपूरमधून पूनम शर्मा उमेदवार असतील. रवींद्र कुमार यांना बवाना राखीव जागेवरून उमेदवार करण्यात आले आहे. रविकांत उज्जैन त्रिलोकपुरीमधून निवडणूक रिंगणात असतील. गोकुळपूरमधून प्रवीण निमिष यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपपक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून चौथी यादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आतापर्यंत भाजपने एकूण 70 विधानसभा मतदारसंघांपैकी 68 उमेदवारांची घोषणा केली आहे. उर्वरित बुरारी आणि देवलीवर या दोन जागांवर भाजप उमेदवार उभे करणार नाही. हे दोन मतदारसंघ आघाडीतील भागीदार जेडीयू आणि एलजेपी (आर) यांना सोडण्यात आले आहेत. दरम्यान, नितीश कुमार यांच्या पक्षानेही दिल्लीतील निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. जदयूने बुरारी येथून पक्षाचे दिल्ली अध्यक्ष शैलेंद्र कुमार यांना उमेदवारी दिली आहे. जेडीयू भाजपसोबत युती करून निवडणूक लढवत आहे. दिल्लीत 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 8 जानेवारी रोजी निकाल जाहीर होतील.









