उत्तरप्रदेशातील पक्षाचे ज्येष्ठ नेते
वृत्तसंस्था /आगरा
भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार हरद्वार दुबे यांचे निधन झाले आहे. निधनासमयी ते 74 वर्षांचे होते. आगरा तसेच पश्चिम उत्तरप्रदेशात जनसंघ तसेच भाजपचा प्रभाव वाढविण्याचे श्रेय हरद्वार दुबे यांनाच दिले जाते. हरद्वार दुबे यांचे नवी दिल्लीत निधन झाले असून तेथून त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आगरा येथे आणले गेले. हरद्वार दुबे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत संघटनमंत्री म्हणून काम केले होते. 1989 मध्ये त्यांनी आगरा कँटोन्मेंट मतदारसंघात काँग्रेसचे दिग्गज नेते डॉ. कृष्णवीर सिंह कौशल यांना पराभूत केले होते. कल्याण सिंह यांच्या सरकारमध्ये ते अर्थ राज्यमंत्री होते. 2013 मध्ये दुबे यांना भाजप उत्तरप्रदेश उपाध्यक्ष तसेच प्रवक्तेपद देण्यात आले होते. 26 नोव्हेंबर 2020 रोजी त्यांनी राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली होती.









