जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
बेळगाव : राज्यात सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारकडून नागरिकांना दिलेल्या गॅरंटी योजनेतील आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. गृहलक्ष्मी योजनेचा लाभ सर्व महिलांना मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्याप्रमाणे याची पुर्तता झालेली नाही. अनेक महिला या योजनेपासून वंचित आहेत. तर राज्यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना 8 तास वीजपुरवठा करणे आवश्यक आहे. असलेल्या पिकांना पाणी देवून पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होणार आहे. मात्र राज्य सरकारकडून केवळ पाच तास वीजपुरवठा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर पुरवठाही सुळीत होत नाही. शेतकऱ्यांना योग्य वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी माजी आमदार अनिल बेनके, खासदार मंगला अंगडी, अॅड. एम. बी. जिरली आदी कार्यकर्ते उपस्थित होते.









