राहूल गांधींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी व्यक्त केला संताप
पणजी : भाजपच्या राष्ट्रीय हँडलवरून काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहूल गांधी यांचा पोस्टर प्रदर्शित करून अत्यंत हीन शब्द वापरून त्यांची संभावना करणाऱ्या भाजपच्या या कृतीचा निषेध करत गोवा प्रदेश काँग्रेस समितीने काल पणजीत निदर्शने केली. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्टा, डॉ. प्रमोद साळगावकर, यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपच्या या हीन कृत्याचा निषेध करताना प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी भाजपने राहूल गांधी यांना उद्देशून रावण, रामविरोधी यासारखे शब्द वापरले आहेत. तसेच भारत नष्ट करणे हा त्यांचा उद्देश आहे, असेही म्हटले आहे. हे कृत्य निव्वळ असंवैधानिक होते, असे सांगितले. प्रत्यक्षात मोदी सरकारने आज लोकांमध्ये विविध धर्मांच्या नावाने फूट घालण्याचे षडयंत्र चालविले आहे. या जुमला पार्टी सरकारने लोकांना असंख्य आश्वासने दिली होती. विदेशातील काळा पैसा आणून प्रत्येक भारतीयाच्या खात्यात जमा करण्यात येईल हे त्यांचे सर्वात मोठे आश्वासन होते, जे आजपर्यंत पूर्ण करण्यात आलेले नाही, असे पाटकर म्हणाले.
याऊलट राहूल गांधी यांनी संपूर्ण देशवासियांना एकत्र आणण्यासाठी काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत सुमारे 4 हजार किमीची पदयात्रा केली. त्यांचे हे देशासाठी दिलेले योगदान भाजपला पाहवत नाही, पचनी पडत नाही म्हणुनच त्यांनी गांधी यांचे बदनामी षडयंत्र चालविले आहे. यावरून खरा रावण कोण आहे याचा जनतेनेच विचार करावा, असे त्यांनी पुढे सांगितले. युरी आलेमाव यांनी बोलताना राहूल गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा जोरदार निषेध केला. भाजपच्या प्रत्येक राष्ट्रीय आणि स्थानिक नेत्यांना आपण सांगू इच्छितो की अशाच देशविघातक शक्तींनीच राहूल यांचे वडील राजीव आणि आजी इंदिरा यांची हत्या केली होती. तेच आज धर्माच्या नावाने लोकांमध्ये फूट घालत असल्याचे सांगताना आलेमाव यांनी भाजपचे हे सर्व प्रयत्न केवळ येत्या लोकसभा निवडणुवेळी लोकांची मने कलुषित करण्यासाठी चालले आहेत, असा दावा केला. अन्य नेत्यांनीही यावेळी विचार मांडताना भाजपचा जोरदार निषेध व्यक्त केला.









