उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ठरले कारण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नव्या भाजप अध्यक्षाच्या निवडणुकीची चर्चा दीर्घकाळापासून सुरू आहे. परंतु जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिल्याने भाजपचे पूर्ण लक्ष आता या पदासाठी होणाऱ्या आगामी निवडणुकीवर केंद्रीत झाले आहे. भाजप अता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतरच स्वत:च्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करणार असल्याचे बोलले जात आहे. जगदीप धनखड यांनी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होताच अचानक उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला होता. आरोग्याच्या कारणामुळे पदमुक्त होऊ इच्छित असल्याचे धनखड यांनी सांगितले होते. तर निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतिपदासाठी निवडणूक जाहीर केली आहे. 9 सप्टेंबर रोजी ही निवडणूक होणार असून त्याचदिवशी संध्याकाळी याचा निकाल जाहीर होणर आहे. विरोधी पक्ष इंडी आघाडीच्या अंतर्गत संयुक्त उमेदवार उभा करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
या निवडणुकीकरता 21 ऑगस्ट ही अर्ज भरण्यासाठीची अंतिम मुदत आहे. अशास्थितीत विरोधी पक्ष आणि सत्तारुढ पक्षाकडे उमेदवार घोषित करण्यासाठी पुरेसा कालावधी आहे. राज्यसभा आणि लोकसभेत एकूण 782 खासदार आहेत. रालोआकडे लोकसभेत 293 तर इंडी आघाडीकडे 232 खासदार आहेत. तर राज्यसभेत रालोआकडे 133 तर इंडी आघाडीकडे 107 खासदार आहेत. अशास्थितीत संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये रालोआचे पारडे जड आहे.
भाजप अध्यक्ष निवडणुकीला विलंब
वर्तमान भाजप अध्यक्ष जगतप्रकाश न•ा यांचा कार्यकाळ 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर संपुष्टात येत होता, परंतु त्यांच्या कार्यकाळात मिळालेले यश पाहता त्यांचा कार्यकाळ वाढविण्यात आला होता. आता भाजप अध्यक्षाच्या घोषणेसाठी उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक पूर्ण होण्याची घोषणा पक्ष करत असल्याचे मानले जात आहे. बिहार निवडणुकीपूर्वी भाजपकडून राष्ट्रीय अध्यक्ष घोषित केला जाऊ शकतो.
पावसाळी अधिवेशनावर लक्ष
उपराष्ट्रपती हे देशाच्या दुसऱ्या सर्वोच्च पदासोबत राज्यसभेचे सभापतीही असतात. पक्षाचा नवा अध्यक्ष नियुक्त झाल्यास पक्षसंघटनेत नव्या हालचाली होतात, राज्यस्तरावर धोरणांमध्ये बदल, कार्यकर्त्यांना नवी जबाबदारी आणि रणनीति बदल होऊ शकतो. परंतु पक्षाला सध्या संयम, स्थिरतेची गरज आहे, जेणेकरून संसदेच्या महत्त्वाच्या अधिवेशनात स्थिती सांभाळत बिहार तसेच बंगाल विधानसभा निवडणुकीची तयारी करता येऊ शकेल असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे.
अनेक नावांची चर्चा
भाजपच्या नव्या अध्यक्षासाठी अनेक वरिष्ठ नेत्यांच्या नावावर चर्चा करण्यात आली आहे. यात संघटनात्मक अनुभव, प्रशासकीय क्षमता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आणि निवडणूक दक्षता यासारखे निकष पाहिले जात आहेत. नवा अध्यक्ष हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या 2029 पर्यंतच्या रणनीतिशी जुळवून घेणारा असेल.
भाजपची रणनीति
पुढील पिढीच्या नेत्यांना तयार करण्याची भाजपच रणनीति आहे. तसेच पक्षाच्या मुख्य विचारसरणी आणि नेतृत्वाची लय कायम ठेवण्यावर भाजपचा भर आहे. सध्या पक्षाध्यक्षाची घोषणा टाळल्याने पक्षाला गटबाजीच्या कयासांपासून वाचण्यास मदत मिळू शकते. खासकरून उपराष्ट्रपती निवडणुकीत प्रत्येक सहकारी आणि प्रत्येक मत महत्त्वपूर्ण ठरू शकते. यामुळे नव्या अध्यक्षाच्या निवडीत जातीय, क्षेत्रीय आणि पिढीगत संतुलन कसे साधले जावे याचा विचार करण्यास पक्षाला वेळही मिळणार आहे.









