डिचोली : सांखळी पालिका निवडणूक अटीतटीची होत असून या निवडणुकीत भाजप व टुगेदर फॉर साखळी या दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत भाजपने पहिल्या दिवसापासूनच सर्वच पातळीवर आपली पकड घट्ट केली आहे. भाजपचा खुलेआम प्रचार सुरू आहे. तर टुगेदर फॉर सांखळी गटाचा अतिशय सावधपणे व गुप्तपणे प्रचार सुरू आहे. भाजप नेत्यांत संभ्रमावस्थात निर्माण झाल्याचे चित्र आहे. साखळी नगरपालिका निवडणूक ही यावेळी लक्षवेधी ठरणार हे स्पष्ट आहे. अपेक्षेप्रमाणे निवडणूक प्रचार रंगतदार स्थितीत पोचला आहे. भाजपने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. सर्व उमेदवारांची अधिकृतपणे घोषणा करून सर्व लोकांना आपल्या उमेदवारांचे चेहरे दाखविले आहेत. तसेच सर्व प्रभागांमध्ये रूसवे फुगवे मिटवून सर्वत्र खेळीमेळीचे वातावरण तयार केले आहे. त्यामुळे त्यांच्या सर्वत्र प्रचाराला बराच जोर आलेला आहे. भाजपने आपल्या सर्व प्रभागांमध्ये प्रभारी नियक्ती करून काम सुरू ठेवले आहे. दररोजचा प्रचार अहवाल श्रेष्ठींना पाठवून त्यावर चर्चा होते. त्यानुसार प्रचाराचे नियोजन केले जात आहे. यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. सध्यातरी त्यांना सर्व दहाही प्रभागांमध्ये विजयाची खात्री आहे.
टुगेदर फॉर साखंळीचा गुप्त प्रचारावर जोर
एका बाजूने भाजपने प्रचाराला जोर लावला असताना दुसऱ्या बाजूने टुगेदर फॉर सांखळी गटातील सर्व उमेदवारांनी गुप्त प्रचारावार जोर दिला आहे. तसेच सोबत एक किंवा दोन समर्थक घेऊन फिरत आहेत. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते, समर्थक व मतदारही नजरेस येत नाही. तर टुगेदरच्या उमेदवारांसोबत फिरणाऱ्या कार्यकर्त्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप टुगेदरच्या उमेदवारांनी केला आहे.
दबावसत्रामुळे ‘टुगेदरत’र्फे प्रचाराच्या खेळीत बदल
या दबावसत्रामुळे टुगेदरच्या सर्व उमेदवारांनी आपल्या समर्थकांना समवेत घेऊन फिरण्याचेच बंद केले आहे. सध्या हे सर्व उमेदवार आपल्या खास एक किंवा दोन समर्थकांना घेऊन फिरतात. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते तसेच समर्थक ओळखणे कठीण बनत आहे. याच कारणामुळे भाजपचे काही नेते संभ्रमात पडले आहेत.









