वृत्तसंस्था / जम्मू
जम्मू भागात भारतीय जनता पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर स्पर्धेत राहणार आहे. काश्मीर खोऱ्यात मात्र, अपक्ष उमेदवारांशी युती करण्यास हा पक्ष सज्ज आहे. निवडणुकीसाठी रणनिती निर्धारित करण्याकरीता रविवारी येथे ज्येष्ठ पक्षनेत्यांची बैठक झाली. या बैठकीत जम्मू-काश्मीरमधील पक्षाचे प्रभारी किशन रे•ाr, पक्षाचे राष्ट्रीय महासचिव तरुण चुघ आणि केंद्रीय मंत्री जीतेंद्र सिंग यांचा समावेश होता. या बैठकीत निवडणुकीसंबंधी अनेक विषयांवर चर्चा झाली.
जम्मूत पक्ष स्वबळावर लढणार असला तरी, काश्मीरमध्ये मात्र अपक्षांशी युती केली जाणार आहे. काश्मीर खोऱ्यात अनेक स्थानी अपक्ष उमेदवार प्रबळ असल्याचे पक्षाला दिसून आले आहे. त्यामुळे त्यांच्याशी आवश्यकतेनुसार युती केली जाणार आहे. पक्षाने या संदर्भात मतदारसंघांची सूची तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. पुढच्या आठवड्यापासून पक्ष या केंद्रशासित प्रदेशात प्रचारकार्याचा शुभारंभ करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही अनेक प्रचारसभांना संबोधित करतील, अशी माहिती स्थानिक पक्षनेत्यांकडून देण्यात आली आहे.
जुल्फकार अली भाजपमध्ये
काश्मीर खोऱ्यातील अपनी पार्टी या पक्षाचे नेते जुल्फकार अली यांनी रविवारी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. चौधरी जुल्फकार अली हे जम्मू-काश्मीरचे माजी मंत्रीही आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे या भागात भारतीय जनता पक्षाचे सामर्थ्य वाढणार आहे, असे ज्येष्ठ नेत्यांनी प्रतिपादन केले.









