भाजप पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री डॉ .प्रमोद सावंत यांना निवेदन
प्रतिनिधी
बांदा
बांदा शहर हे गोवा राज्याच्या सीमेवरचे शहर आहे. बांदा शहराच्या दशक्रोशीतून अनेक युवक, युवती शिक्षणासाठी, नोकरीसाठी, उपचारासाठी व अन्य काही कामासाठी गोवा राज्यात जात असतात. सकाळी ७.०० वाजेपर्यंत गोव्याला जाण्यासाठी एकही बस सेवा उपलब्ध नसते, त्याचप्रमाणे जी मुले गोवा राज्यांमध्ये शिक्षण घेतात त्यांच्या परीक्षेच्या वेळेला वेळेत पोहोचणे अतिशय महत्त्वाचे असते. पत्रादेवी ते मडगाव बस ही सकाळी ६.२० वाजता महामार्गावरून निघते सदर ६.२० ची बस जर बांदेश्वर मंदिर कडून निघाली तर सर्वांची सोय होईल, शिवाय सावंतवाडी ते पणजी, मडगाव ज्या बस सेवा आहेत त्या महामार्गावरून न जाता बांदा शहरातून जाव्या. अशी मागणी भारतीय जनता पार्टी बांदा शहरच्या वतीने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली. स्वातंत्र्यदिनी पत्रादेवी हुतात्मा स्मारक येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आले होते. यावेळी भाजपा महिला जिल्ह्याध्यश श्वेता कोरगावकर, माजी सभापती शीतल राऊळ, भाजपा शहराध्यक्ष बाबा काणेकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, संतोष सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश विरनोडकर, हुसेन मकानदार, सुनील राऊळ, मंदार महाजन, गुरु कल्याणकर, निलेश कदम आदी उपस्थित होते.









