खासदार संजय सिंह यांचा दावा : मतमोजणीपूर्वीच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे मतदान 5 फेब्रुवारी रोजी पूर्ण झाले असले तरी भाजप आणि आम आदमी पार्टीचे नेते अजूनही एकमेकांवर आरोप करत आहेत. भाजपने आपल्या पक्षाचे आमदार कोट्यावधींची रक्कम देऊन फोडल्याचा आरोप गुरुवारी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी केला. पक्ष सोडून भाजपमध्ये सामील होण्यासाठी ‘आप’च्या सात आमदारांना प्रत्येकी 15 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे, असा दावा संजय सिंह यांनी केला आहे.
दिल्ली विधानसभा क्षेत्रामध्ये बुधवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी बुधवारी 60.44 टक्के लोकांनी मतदान केले. आता शनिवार, 8 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. मात्र, मतमोजणीपूर्वी राजकीय तापमान तापले आहे. ‘आप’ने भाजपवर गंभीर आरोप करत आपल्या उमेदवारांच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. पक्षातील सात उमेदवारांना प्रत्येकी 15 कोटी रुपये देऊन भाजपमध्ये सामील होण्यास सांगण्यात आले आहे, असा आपचा आरोप आहे
आपचे खासदार संजय सिंह यांनी पक्ष मुख्यालयात गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. मतमोजणीपूर्वीच भाजपने आपला पराभव मान्य केला आहे. देशाच्या इतर भागांप्रमाणे, दिल्लीतही भाजपने पक्ष फोडण्याचे राजकारण सुरू केल्याचे सांगत त्यांनी भाजपचे सरकार स्थापन होणार नसल्याचा पुनरुच्चार केला. तसेच भाजप फोडाफोडीचे राजकारण करण्याच्या प्रयत्नात असल्याचे ते म्हणाले. भाजप नेते ‘आप’च्या सात उमेदवारांशी संपर्क साधून त्यांना प्रत्येकी 15 कोटी रुपये देऊन पक्षात समाविष्ट करू इच्छिते, असेही त्यांनी सांगितले. आपच्या या आमिषाला बळी न पडता सर्व उमेदवारांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. जर कोणी तुम्हाला भेटले आणि पैसे देऊ केले तर छुप्या कॅमेऱ्याने व्हिडिओ बनवा, असेही त्यांनी स्पष्ट केले.









