वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पीलीभीतचे भाजप खासदार वरुण गांधी यांनी राष्ट्रीय शिख संमेलनाच्या व्यासपीठावर जात स्वपक्षीय सरकारला लक्ष्य केले आहे. शीख हा सर्वात बहादुर समुदाय असून तो कट्टर राष्ट्रभक्त आहे. माझ्या नसांमध्ये शिखांचे रक्त वाहते ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मी संजय गांधी यांचा पुत्र आहे. त्यांच्याकडून मी कमी बोलणे आणि काम अधिक करणे शिकलो आहे. शेतकरी आंदोलन सुरू असताना त्याचे समर्थन करणारा मी पहिला खासदार होतो. मी राजकारणाची पर्वा करत नाही. खासदार म्हणून मी आजपर्यंत एक रुपयाचे वेतनही स्वीकारलेले नसल्याचे वरुण गांधी यांनी म्हटले आहे.
शेतकरी आंदोलनात 500 जण हुतात्मा झाले. लखीमपूर खिरीत जे घडले ते सहन करण्यासारखे नव्हते. मला किती मते मिळतील याची पर्वा नाही. एक व्यक्ती उभा असून त्याच्या शरीरावर टॅक्टर चढविण्यात आल्यावर गप्प बसून राहणे मला शक्य नव्हते असे म्हणत वरुण गांधी यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे.