भाजप खासदार कठेरियांना 2 वर्षांची शिक्षा
वृत्तसंस्था/ आगरा
उत्तरप्रदेशच्या इटावाचे भाजप खासदार राम शंकर कठेरिया यांना एका प्रकरणी आगरा न्यायालयाने दोषी ठरविले आहे. एमपी-एमएलए न्यायालयाने कठेरिया यांना कलम 147 आणि 323 अंतर्गत दोषी ठरविले आहे. भाजप खासदारावर साकेत मॉलमधील टोरंट कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केल्याचा आरोप होता. 16 नोव्हेंबर 2011 रोजी ही घटना घडली होती. याप्रकरणी न्यायालयाने कठेरिया यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या शिक्षेमुळे कठेरिया यांना संसद सदस्यत्व गमवावे लागू शकते.
टोरंट पॉवर लिमिटेडच्या आगरा येथील कार्यालयात व्यवस्थापक भावेश रसिक लाल शाह हे वीजचोरीशी संबंधित प्रकरणांची सुनावणी करत असताना कठेरिया हे स्वत:च्या समर्थकांसह तेथे पोहोचले होते. कठेरिया आणि त्यांच्या समर्थकांनी शाह यांना मारहाण केल्याचा आरोप होता. याप्रकरणी टोरंट पॉवरचे सुरक्षा निरीक्षक समेधी लाल यांनी तक्रार केली होते. याच आधारावर कठेरिया यांच्या विरोधात खटला चालला होता.









