बृजेंद्र सिंह यांचा भाजपला रामराम
वृत्तसंस्था/ हिसार
माजी केंद्रीय मंत्री विरेंद्र सिंह यांचे पुत्र आणि हिसारचे भाजप खासदार बृजेंद्र सिंह यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. बृजेंद्र सिंह यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर जजप नेते आणि हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौताला यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केल्यावर बृजेंद्र सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत दिल्लीत काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे मी आभार मानतो, परंतु काही मुद्द्यांवर मी सहमत नव्हतो. शेतकरी तसेच महिला कुस्तीपटूंच्या मुद्द्यामुळे मी भाजपसोबत राहू शकलो नाही असे बृजेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.
2 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या जींद येथील सभेत हरियाणातील भाजप-जजप आघाडीसंबंधी मुद्दा उपस्थित केला होता. यावरून निर्णय घेण्यात आला आण याचमुळे मी भाजप सोडत नसल्याचे सिंह यांनी म्हटले आहे. काँग्रेस महासचिव आणि माजी केंद्रीय मंत्री कुमारी शैलजा यांनी वरिष्ठ नेते चौधरी विरेंद्र सिंह यांचे पुत्र, भाजपचे हिसार खासदार बृजेंद्र सिंह यांचे काँग्रेसमध्ये स्वागत असल्याचे म्हटले आहे.
चौधरी विरेंद्र सिंह यांच्या कुटुंबासोबत आमचे नाते कित्येक पिढ्यांचे राहिले आहे. त्यांचा पुत्र बृजेंद्र काँग्रेसमध्ये परतत असल्याने आम्ही आनंदी आहोत. लवकरच चौधरी विरेंद्र सिंह हे काँग्रेसमध्ये सामील होतील आणि न्यायाच्या लढाईत आमची साथ देतील अशी आशा करत असल्याचे कुमारी शैलजा यांनी नमूद केले आहे.
बृजेंद्र यांचे वडिल आणि माजी केंद्रीय मंत्री विरेंद्र सिंह आणि त्यांच्या पत्नी प्रेमलता देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. परंतु दोघेही अद्याप भाजपमध्ये असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. चौधरी विरेंद्र सिंह हे हरियाणातील प्रमुख जाट नेते आहेत. हिसारमध्ये चौधरी विरेंद्र सिंह आणि जजपचे नेते दुष्यंत चौताला यांच्यात राजकीय वर्चस्वावरून संघर्ष सुरू आहे. याच संघर्षातून बृजेंद्र यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याचे मानले जात आहे.









