ऑनलाईन टीम/तरुण भारत
पश्चिम बंगालमध्ये (west bengal) तृणमूल काँग्रेसने (TMC) भाजपला (BJP) मोठा धक्का दिला आहे. अर्जुन सिंग तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले. बंगालमधील बराकपूर मतदारसंघातील भाजप खासदार अर्जुन सिंह (mp arjun singh) यांनी रविवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अर्जुन सिंह यांना टीएमसीचे सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांनी पक्षात समाविष्ट केले. वास्तविक अर्जुन सिंह अनेक दिवसांपासून भाजपच्या विरोधात भाषणबाजी करत आहेत. त्यांनी अनेक महिन्यांपासून पक्षाच्या बैठकांपासूनही अंतर ठेवले आहे.
भाजप खासदार अर्जुन सिंह टीएमसीमध्ये सामील झाल्यानंतर म्हणाले की, ज्या राजकीय पक्षात इतरांकडे बोट दाखविण्याचा प्रयत्न केला जातो, त्याच भाजपमध्ये अजूनही टीएमसीचे 2 खासदार आहेत ज्यांनी राजीनामा दिलेला नाही. मी त्यांना विनंती करेन की, त्या दोन्ही खासदारांनी राजीनामा द्यावा. मी एक तासही घेणार नाही, मी लगेच राजीनामा देईन. ते म्हणाले की, बंगालमध्ये भाजप फक्त एअर कंडिशनरमध्ये बसून फेसबुकवरून राजकारण करू शकत नाही. त्यामुळे बंगाल भाजपचा आलेख दिवसेंदिवस घसरत चालला आहे. राजकारण जमिनीच्या पातळीवर करावे लागते.
अभिषेक बॅनर्जी यांनी केले स्वागत
तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी अर्जुन सिंग यांचे दक्षिण कोलकाता येथील त्यांच्या कार्यालयात पक्षात आल्याबद्दल स्वागत केले. त्यानंतर टीएमसीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटले की, अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस परिवारात बंगालचे भाजपचे माजी उपाध्यक्ष आणि बराकपूरचे खासदार अर्जुन सिंग यांचे हार्दिक स्वागत आहे. आमचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत ते आज आमच्यात सामील झाले.