लोकसभा निवडणुकीत असणार उमेदवार
वृत्तसंस्था/ रांची
झारखंडमधील भाजप आमदार आणि माजी मंत्री जयप्रकाश पटेल यांनी बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पटेल यांनी काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले आहे. पटेल हे सलग तीनवेळा मांडू विधानसभा मतदारसंघात विजयी झाले आहेत. पटेल यांनी झामुमोमधून राजकीय कारकीर्द सुरू केली होती. परंतु नंतर ते भाजपमध्ये सामील झाले होते.
पटेल यांना काँग्रेसकडून हजारीबाग मतदारसंघाची उमेदवारी दिली जाणार आहे. हजारीबागच्या ऐवजी गिरिडीह हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आल्यास तेथील उमेदवारी पटेल यांना मिळू शकते. पटेल यांच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला कुर्मी-कुडमी समुदायाचा एक मोठा नेता मिळाला आहे. पटेल यांचा हजारीबागसोबत गिरिडीह, धनबाद आणि रांची लोकसभा मतदारसंघात प्रभाव असल्याचे मानले जाते.
झामुमो आमदार सीता सोरेन यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर मागील महिन्यात काँग्रेस खासदार गीता कोडा यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले होते. याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने पटेल यांचा पक्षप्रवेश घडवून आणला असल्याची चर्चा आहे.









