वृत्तसंस्था /लखनौ
उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमधील कॅम्पियरगंजचे 7 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले भाजप नेते फतेह बहादुर सिंह यांनी स्वत:च्या जीवाला धोका असल्याचे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहुन सुरक्षेची मागणी केली आहे. माझ्या विरोधकांकडून हत्येचा कट रचला जात आहे. याकरता एक कोटी रुपयांची सुपारी म्हणून विरोधकांनी रक्कम जमविली आहे. विरोधकांचे पोलिसांसोबत साटंलोटं आहे. माझ्या वडिलांचे निधन वयाच्या 52 व्या वर्षी झाले. माझाही मृत्यू वयाच्या 54 व्या वर्षी होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
सुमारे 11 दिवसांपूर्वी एका कॉलद्वारे मला जीवाला धोका असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर विरोधकांनी हत्येची सुपारी देण्याची तयारी चालविली असल्याचे कळले. याची कल्पना मी राज्य सरकारला दिली. परंतु 10 दिवसांनंतरही कुठलीच चौकशी न झाल्याने मीच पोलीस अधिकाऱ्याकडे विचारणा केली. यानंतरच केंद्रीय नेतृत्वाला याची माहिती दिली आहे. हत्येचा कट रचणाऱ्यांचा पर्दाफाश केला जावा असे त्यांनी म्हटले आहे. फतेह बहादुर सिंह हे माजी मुख्यमंत्री वीर बहादुर सिंह यांचे पुत्र आहेत. तसेच ते बसप सरकारमध्ये वनमंत्री राहिले आहेत.









