भाजपच्या 180 उमेदवारांची होणार घोषणा : काँग्रेस-निजदकडून प्रतीक्षा
प्रतिनिधी/ बेंगळूर
विधानसभा निवडणुकीसाठी 13 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. काँग्रेसने 166 तर निजदने 93 मतदारसंघांमधील उमेदवार जाहीर केले आहेत. परंतु, भाजपची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे भाजपच्या उमेदवार यादीविषयी उत्सुकता आणखी ताणली गेली आहे. बंडखोरीची चिंता, मुलांसाठी तिकिटाची मागणी, विधानपरिषद सदस्यांकडूनही दबाव यामुळे भाजपच्या यादीला विलंब होत आहे, अशी चर्चा आहे. कर्नाटकात गुजरात मॉडेलचा अवलंब करण्याचा निर्णय भाजपश्रेष्ठींनी घेतला आहे. याकरिता मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. मंगळवारी रात्री उशिरा किंवा बुधवारी उमेदवार जाहीर केले जाणार आहेत.
शनिवारी आणि रविवारी नवी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. तर सोमवारी भाजपाध्यक्ष जे. पी. न•ा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवास्थानी स्वतंत्रपणे तीन बैठका झाल्या. यावेळी 170 ते 180 उमेदवारांच्या यादीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते. तर विद्यमान 16 आमदारांना तिकिटापासून वंचित रहावे लागण्याची शक्यता आहे. त्यामध्ये 5 मंत्र्यांच्याही समावेश असल्याचे समजते. 170 उमेदवारांची नावे पहिल्या टप्प्यात जाहीर केली जाणार आहेत. या वृत्ताला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दुजोरा दिला आहे.
नवी दिल्ली येथे सोमवारी सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी तर दुपारी भाजपाध्यक्ष जे. पी. न•ा यांच्या निवासस्थानी स्वतंत्र बैठका झाल्या. मुख्यमंत्री बसवराज बोम्माईं माजी माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा हे यावेळी सहभागी झाले होते. सायंकाळी जे. पी. न•ा यांनी पुन्हा येडियुराप्पांना बोलावून चर्चा केली. उभयतांमध्ये 10 मिनिटे चर्चा झाली.
दिल्लीत सोमवारी झालेल्या बैठकांमध्ये 180 मतदारसंघातील नावे अंतिम करण्यात आली आहेत. मात्र, 40 मतदारसंघांसाठी उमेदवार निवडीच तिढा सोडविण्यासाठी भाजपला कसरत करावी लागत आहे. त्यामुळे दोन टप्प्यात भाजपचे उमेदवार जाहीर होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
यादी विलंबाची कारणे कोणती?
गेल्या आठवडाभरापासून भाजपच्या यादीविषयी राज्यातील जनतेमध्ये कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. काँग्रेस आणि निजदकडून काही उमेदवारांची घोषणा झाली असताना भाजपला विलंब का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अनेक आमदारांनी आपल्याबरोबरच मुलांनाही तिकीट देण्याची मागणी केली आहे. खासदार करडी संगण्णा, विधानपरिषद सदस्य सी. पी. योगेश्वर, लक्ष्मण सवदी यांच्यासह अनेकांनी तिकिटासाठी अट्टहास धरला आहे. त्यामुळे काही सर्वेक्षणांमध्ये अनेक आमदार विजयी होणार नसल्याचे अनुमान हाती लागल्याने भाजपश्रेष्ठींनी तोलून मापून उमेदवार निवडत आहेत, अशी चर्चा होत आहे.
उमेदवार यादी अंतिम करण्यात गोंधळ नाही : बोम्माई
मंगळवारी किंवा बुधवारी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. उमेदवार अंतिम करण्यात कोणताही गोंधळ नाही. सोवमारी सायंकाळी नावे जाहीर केली जाणार होती. मात्र, अधिक चर्चा करावी लागल्याने मंगळवारी रात्री उशिरा किंवा बुधवारी उमेदवारांची नावे जाहीर केली जातील. काही उमेदवारांविषयी ग्राऊंड रिपोर्ट जमा करावा लागणार आहे. नव्या चेहऱ्यांविषयी देखील चर्चा करावी लागणार आहे, असे मुख्यमंत्री बोम्माई यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या यादीनंतर काँग्रेस-निजदच्या उर्वरित उमेदवारांची घोषणा
काँग्रेसने दोन टप्प्यात 166 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तर निजदने 93 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या दोन्ही पक्षांकडून उर्वरित उमेदवारांची घोषणा केव्हा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतरच काँग्रेसची तिसरी आणि निजदची दुसरी यादी जाहीर होणार आहे.
सोमवारी नवी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्त्वाखाली उमेदवार निवडीसंबंधी चर्चा केली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या व इतर नेते उपस्थित होते. भाजपच्या बंडखोर उमेदवारांना पक्षात आणून त्यांना तिकीट देण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसने दोन-तीन दिवस प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
तर निजद सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा आणि वरिष्ठ नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी स्वतंत्रपणे बैठका घेऊन दुसरी उमेदवार यादी तयार करण्याबाबत चर्चा केली. कोलार वगळता उर्वरित उमेदवार मंगळवारी जाहीर करण्यात येतील, असे कुमारस्वामी यांनी सोमवारी रात्री सांगितले. मात्र, या पक्षानेही एक-दोन दिवस थांबण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.









