वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या पूर्व वर्धमान जिह्यात शनिवारी रात्री काही हल्लेखोरांनी भाजप नेते राजू झा यांची गोळ्या झाडून हत्या केली. राजू झा हे आपल्या काही मित्रांसह कोलकात्याला जात असताना ते शक्तीगढ येथील महामार्गाच्या बाजूला एका दुकानात थांबले. याचदरम्यान वाहनातून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांचा मित्र ब्रातिन मुखर्जी गंभीर जखमी झाला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी टोल प्लाझाजवळ बसवलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. यासोबतच पोलीस चालक आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाबही नोंदवत आहेत. राजूच्या हत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
राजू झा हॉटेलबाहेर आपल्या कारमध्ये बसून सहकाऱ्यांची वाट पाहत होते. याचदरम्यान, हल्लेखोर तेथे आले. त्यातील एकाने रॉडने कारची काच फोडली. यानंतर राजूवर 5 राऊंड गोळीबार करण्यात आला. या हल्यात राजू घटनास्थळीच बेशुद्ध झाले. ऊग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. राजू यांच्या हत्येवर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर पक्षपाती असल्याचा आणि हिंसा भडकावल्याचा आरोप केला. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून त्याला फक्त ममता बॅनर्जी जबाबदार असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला आहे.









