भाजप नेते शैलेश पटेलांवर हल्ला
वृत्तसंस्था/ वापी
गुजरातमध्ये वापी जिल्ह्यातील राता तालुक्यात सोमवारी सकाळी भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. भाजप नेते शैलेश पटेल हे पत्नीसोबत शिव मंदिरात पोहोचले होते. यादरम्यान एका बाइकवरून आलेल्या तीन अज्ञात युवकांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. तीन गोळ्या लागल्याने शैलेश यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याचे प्रारंभिक तपासात दिसून आले आहे. तर पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.
शैलेश पटेल हे कारच्या ड्रायव्हिंग सीटवर बसून पत्नीची प्रतीक्षा करत असताना बाइकवरून आलेल्या युवकांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला होता. घटनेच्या सुमारे 5 मिनिटांनी तेथे पोहोचलेल्या पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात शैलेश यांचा मृतदेह दिसून आला होता. त्यांचा आवाज ऐकून अन्य भाविकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. हत्येची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तपास सुरू केला आहे. तर वापी जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांनीही राता येथे धाव घेतली आहे. पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून यात तिन्ही आरोपी दिसून येत आहेत.









