छत्तीसगड विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या घटनेने सुरक्षा यंत्रणा सतर्क
वृत्तसंस्था / नारायणपूर
भारतीय जनता पक्षाचे नेते रतन दुबे यांची छत्तीसगड राज्याच्या नारायणपूर जिल्ह्यात कौशलनगर गावात हत्या करण्यात आली आहे. ते येथे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करत होते. त्यावेळी त्यांची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. ही हत्या नक्षलवाद्यांकडून करण्यात आल्याचा संशय असून या घटनेच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.
त्यांचा मारेकरी अद्याप सापडला नसून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके सोडण्यात आली आहेत. या भागात नक्षलींच्या हालचाली नेहमी होत असतात. या हत्येसंबंधी भाजपने राज्य शासनावर टीका केली आहे. राज्यात काँग्रेसचे शासन आल्यापासून भाजपचे कार्यकर्ते आणि नेते यांना लक्ष्य करुन त्यांच्या हत्या करण्यात येत आहेत. मारेकऱ्यांना राज्य सरकारचे गुप्त संरक्षण असल्याने आतापर्यंत अशा प्रकारच्या कोणत्याही गुन्ह्याचा तपास गांभीर्याने झाला नाही, असा आरोप भाजपने केला. नारायणपूर मतदारसंघात 7 नोव्हेंबरला मतदान होत आहे. भाजपने आपल्या नेत्यांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
सहावी घटना
भाजपच्या नेत्यांची किंवा कार्यकर्त्यांची हत्या होण्याची ही गेल्या वर्षभरातील सहावी घटना आहे. 20 ऑक्टोबरला भाजपचा कार्यकर्ता बिरजू तरम याची संशयित माओवाद्यांनी गोळी घालून हत्या केली होती. या हत्येचा छडा अद्यापही लागलेला नसताना आणखी एक हत्या झाल्याने राज्य सरकारवर टीका होत आहे.









