पणजी : भारतीय जनता पक्षाचे नेते बी. एल. संतोष हे सायंकाळी उशिरा गोव्यात दाखल झाले. त्यांनी प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांच्याशी चर्चा केली आणि एकंदरीत गोव्यातील राजकीय परिस्थितीचा पक्ष पातळीवर आढावा घेतला. संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून काढण्यासाठी सध्या पक्षावर आणि मुख्यमंत्र्यांवर जनतेचा प्रचंड दबाव आलेला असून त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची होती. बी. एल. संतोष हे धावत्या भेटीवर गोव्यात आले आहेत. ते रात्री उशिरा परत निघणार होते. दामू नाईक आणि संतोष यांच्या दरम्यान विविध विषयांवर चर्चा झाली.
त्यातील सर्वात महत्त्वाची चर्चा म्हणजे वादग्रस्त मंत्री गोविंद गावडे. त्यांना मंत्रिमंडळातून हटविले जाईल किंवा त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल, अशी घोषणा या अगोदरच दामू नाईक यांनी केली होती, मात्र मुख्यमंत्र्यांनी फार गंभीरपणे हे प्रकरण घेतले नव्हते. मात्र राज्यभरातून विविध पातळीवर मंत्री गावडे यांच्या वागण्यामुळे पक्षाला मोठ्या प्रमाणात बसत असलेला धक्का तसेच सरकारच्या प्रतिमेवर झालेला परिणाम, या साऱ्या पार्श्वभूमीवर दामू नाईक यांनी गोविंद गावडे यांना शिस्तभंगाची कारवाई म्हणून मंत्रिमंडळातून हटवावे, अशी मागणी केली होती तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जी काही निवेदने केली त्याबाबतच्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या तसेच विविध वृत्तवाहिन्यांमधून प्रसारित झालेल्या बातम्या हे सर्व पक्षातच्या केंद्रीय कार्यालयाला पाठविले होते. त्याची गंभीर दखल पक्षाने घेतली आणि त्यामुळेच बी. एल. संतोष आणि प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांची भेट ही अत्यंत महत्त्वाची होती. या भेटीनंतर आज वा उद्या महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो.









