साध्वी प्रज्ञा अन् अपर्णा यादव यांना दिली होती धमकी
वृत्तसंस्था/ भोपाळ
भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर आणि पक्षाच्या नेत्या अपर्णा यादव यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱया इसमाला भोपाळ पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही नेत्यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आरोपीचे नाव नासिर असून त्याने फोनवरून बोलत असताना स्वतःचे नाव इक्बाल कासकर असल्याचे सांगितले होते.
अपर्णा यादव यांना जून महिन्यात धमकी मिळाली होती. अपर्णा यादव या समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांच्या सून आहेत. परंतु त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अपर्णा यादव यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यावर कुटुंबात खळबळ उडाली होती.
भाजप खासदार साध्वी प्रज्ञा यांनी भोपाळमधील पोलीस स्थानकात 18 जून रोजी तक्रार नोंदविली होती. फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते. भाजपमधून निलंबित नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानाप्रकरणी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी त्यांचे समर्थन केले होते.









