सावंतवाडी । प्रतिनिधी
डेगवे-तांबुळी रस्त्याच्या खडीकरण आणि डांबरीकरणाला वनविभागाकडून परवानगी मिळत नसल्याने संतप्त झालेल्या भाजप किसान मोर्चाने १५ ऑगस्टपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष प्रवीण बाबाजी देसाई यांनी उपवनसंरक्षक, वनविभाग, सावंतवाडी यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. जर मागणी मान्य झाली नाही, तर स्वातंत्र्यदिनापासून उपोषण केले जाईल, असे पत्रात म्हटले आहे.पत्रात नमूद केले आहे की, डेगवे-तांबुळी रस्ता हा पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत तयार झाला आहे. परंतु, यातील ५०० ते ७०० मीटर लांबीचा रस्ता वनविभागाच्या हद्दीतून जातो. हा रस्ता पुढे १० ते १२ गावांना जोडतो आणि आंबोली येथे येणाऱ्या पर्यटकांसाठीही महत्त्वाचा मार्ग आहे. सध्या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट असून तो चिखलमय झाला आहे. यामुळे वाहतुकीत मोठ्या अडचणी येत आहेत आणि अपघातांची शक्यता वाढली आहे.या गंभीर समस्येबद्दल वनविभागाला अनेकवेळा लेखी पत्रे देण्यात आली आहेत, परंतु विभागाने अद्याप कोणतीही दखल घेतली नाही. या रस्त्याची नोंद टोपोशिटमध्ये असूनही परवानगी दिली जात नसल्याचे देसाई यांनी पत्रात म्हटले आहे.या समस्येवर त्वरित तोडगा काढण्याची मागणी देसाई यांनी केली आहे. जर आहे त्याच लांबी-रुंदीमध्ये रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण करण्यास परवानगी मिळाली नाही, तर १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता उपवनसंरक्षक, वनविभाग सावंतवाडी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या उपोषणात भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष प्रवीण बाबाजी देसाई यांच्यासह डेगवे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ सहभागी होणार आहेत.









