मंत्री सतीश जारकीहोळी : हुदली येथे 5 कोटींच्या विकासकामांना चालना
बेळगाव : काँग्रेस पक्षाकडून राबविण्यात येणाऱ्या विकासकामांना पसंती देऊन भाजप व निजदमधील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत, असे जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. यमकनमर्डी विधानसभा मतदार संघात येणाऱ्या हुदली गावामध्ये यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सीसी रस्त्यासह रस्ता डांबरीकरण, हुदली-कलखांब अशा पाच कोटींच्या इतर विकासकामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच हुदली व कलखांब येथील भाजप, निजदचे कार्यकर्ते काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
विकासकामे पहावत नसल्याचा आरोप
ते म्हणाले, राज्यात सत्तेवर आलेल्या काँग्रेसकडून राज्यभरात गावांचा विकास करण्यात येत आहे. ही विकासकामे पाहून भाजप व निजदचे कार्यकर्ते आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम केल्यास भविष्यामध्ये आणखी अधिक विकास करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. भाजप आणि निजद पक्षाच्या कार्यकाळात कोणतीही विकास कामे झालेली नाहीत. खोटी आश्वासने देऊन नागरिकांची दिशाभूल करण्यात आली आहे. भाजपकडून हेच काम करण्यात आले आहे. आपल्या पक्षाकडून सुरू असलेली विकासकामे त्यांना पहावत नसल्याचा आरोप जारकीहोळी यांनी केला.
समस्यांचे तत्काळ निवारण करणार
हुदली ग्राम देवतेच्या यात्रोत्सवासाठी गावामध्ये 5 कोटी निधीतून विकासकामे राबविण्यात येत आहेत. ग्रामस्थांकडून वेळोवेळी सांगण्यात आलेल्या समस्यांचे तत्काळ निवारण करण्यात आले आहे. यापुढेही अशीच विकासकामे आपल्याकडून केली जातील. प्रत्येकवेळी आपल्याला मतदारांनी अपेक्षित साथ दिली आहे. पहिल्यावेळी 46 हजार, दुसऱ्यावेळी 70 हजार, तिसऱ्यावेळी 73 हजार, चौथ्यावेळी 1 लाख 4 हजार मतांनी आपला विजय झाला आहे. गेल्या 15 वर्षांत यमकनमर्डी मतदार संघात येणाऱ्या प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आली आहेत. यापुढेही हे कार्य असेच सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप व निजदमधून काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेल्या तरुणांकडून मंत्री जारकीहोळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पांडू मण्णिकेरी, अरविंद कारची, ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









