जत, प्रतिनिधी
भाजपाचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख व जिल्हा परिषदेचे माजी सभापती तम्मनगौडा रवीपाटील यांनी आज नवीदिल्ली येथे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. जत तालुक्यातील रस्ते विकासाबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच नागपूर गोवा ग्रीन फिल्ड एक्सप्रेस हायवे जत तालुक्यातून जाण्याबाबत अग्रेसर राहण्याची मागणी केली. गडकरी यांना जत तालुका दौऱ्याचे निमंत्रण ही देण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत सुप्रसिद्ध उद्योजक प्रसन्न आजरेकर उपस्थित होते.
या भेटीत रवी पाटील यांनी जत तालुक्यातून सध्या तीन राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. मात्र या महामार्गाची कामे अपूर्ण आहेत. तसेच जत शहरांमधील महामार्गावर दुभाजक बसवण्याचा प्रश्नही प्रलंबित आहे. हे सर्व प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली. जत शहरातील रस्त्यावर असणारा दुभाजकाचा प्रश्न पंधरा दिवसात मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच मुचंडी व कुंभारी येथील अपूर्ण कामे लगेच पूर्ण होणार आहेत. तर गोवा नागपूर ग्रीन फिल्ड हायवे जत तालुक्यातील सोन्याळ, माडग्याळ, गुड्डापुर, मुचंडी, बिलूर येथून नेण्यासाठी कारवाई करावी अशी विनंती पाटील यांनी गडकरी यांच्याकडे केली.
दरम्यान, जत ते चडचण व जत ते अथणी हे दोन रस्त्यांचाही राज्य मार्गात समावेश झाल्याने या रस्त्यांसाठी ही निधी उपलब्ध करून देण्याची रवी- पाटील यांनी मागणी केली आहे.








