लोकसभा निवडणुकीपूर्वी इतर पक्षांचे नेते मोठ्या संख्येने पक्षात दाखल होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात होणाऱ्या पुढील सार्वत्रिक निवडणुकांना फारसा वेळ उरलेला नाही. त्यादृष्टीने सर्व प्रमुख पक्ष आपापल्या तयारीत व्यस्त आहेत. विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ ही महाआघाडी स्थापन केली असतानाच भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमधील पक्षही वाढत चालले आहेत. रालोआ अधिक भक्कम करण्याबरोबरच दर महिन्याला इतर पक्षांच्या नेत्यांना पक्षात सामील करून भाजपलाही अधिक बळकट करण्यासाठी पक्षातील वरिष्ठांनी मास्टर प्लॅन तयार केल्याचे समजते.
अलीकडेच सपा आमदार दारासिंह चौहान यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ‘सुभासपा’चे अध्यक्ष ओ. पी. राजभर आणि लोजपचे चिराग पासवान हेही आता भाजपसोबत आहेत. याशिवाय 24 जुलै रोजी सपा आणि एलडीचे अनेक नेते पक्षात प्रवेश करणार आहेत. तसेच नजिकच्या काळात आरएलडी नेते आणि माजी खासदार राजपाल सैनी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. याशिवाय माजी मंत्री साहेबसिंह सैनी हे देखील भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. सपा नेते जगदीश सोनकर, सपा नेत्या सुषमा पटेल, गुलाब सरोज आणि माजी आमदार अंशुल वर्मा हे देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत मिळत असून बिहार, उत्तर प्रदेशमध्ये भाजपची स्थिती मजबूत होणार आहे.
एनडीएचा पक्षपरिवार वाढला
18 जुलै रोजी भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएची दिल्लीत बैठक झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाची ताकद दिसून आली. या बैठकीत 38 पक्ष सहभागी झाले होते. या बैठकीपूर्वी ओ. पी. राजभर यांचा सुहेलदेव भारतीय समाज पक्ष (सुभासपा) आणि चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) एनडीएमध्ये सामील झाले होते.
विरोधी पक्षांची महाआघाडी
एकीकडे एनडीएमधील पक्षांची संख्या वाढत असताना दुसरीकडे विरोधी पक्षांनीही महाआघाडी केली आहे. या आघाडीला ‘इंडिया’ असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये आतापर्यंत 26 पक्ष सहभागी झाले आहेत. विरोधी पक्षांची पुढील बैठक मुंबईत बोलावण्यात आली आहे. मात्र, त्याची निश्चित तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.









