राष्ट्रवादीमध्ये पवारांची पुढची पिढी अजितदादांना पक्षातील मातब्बर नेत्यांसह फोडून भाजपने आपली बाजू भक्कम केली आहे. पण, या निर्णयाने वर्षानुवर्षे पवारांच्या राजकारणाशी टक्कर देणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि मित्रपक्षांना दुर्बळ करून ठेवले आहे. त्याहून वाईट स्थिती मुख्यमंत्री शिंदे सेनेची झाली आहे.
अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी फारकत घेऊन भाजपशी हातमिळवणी केली. इतकेच नव्हे तर शरद पवारांच्या महाविकास आघाडी स्थापनेनंतर निर्माण झालेल्या प्रतिमेला जोराचा धक्का देणारी वक्तव्ये केली. त्यांना घरी बसण्याचा सल्ला देत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटवून स्वत: अध्यक्ष असल्याचे निवडणूक आयोगाला पत्र दिले. या सगळ्या जोरदार कामगिरीच्या बक्षीसापोटी त्यांना उपमुख्यमंत्रीपद आणि छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह शरद पवारांच्या आठ निकटवर्तीयांना थोरल्या पवारांना सोडल्याबद्दल मंत्रिपद बहाल करण्यात आले आहे. खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनाही केंद्रात त्यांच्या या बंडखोरीबद्दलचा योग्य मेहनताना मिळवून दिला जाईल. येत्या पावसाळी अधिवेशनात ते दिल्लीच्या सत्तापावसात पावन होतील.
या सगळ्या घडामोडींचे परिणाम जिथे जिथे व्हायचे तेथे होऊ लागले आहेत. पवारांनी अजित पवारांच्या आरोपावर थेट उत्तर न देता सौम्य भाषा ठेवली. मात्र आपल्याला निवडणूक आयोगात आणि न्यायालयात लढायची वेळ अजित पवार आणणार हे पाहून दादांसह सर्व प्रमुखांची हकालपट्टी केली. त्यांना अपेक्षेप्रमाणे राहुल गांधी यांनी घरी भेटून पाठिंबा दर्शवला. राष्ट्रवादीत मागे राहिलेल्या आणि पूर्वी मंत्रिपद भूषवलेल्या मंडळींनी हळूहळू करत दादांची सत्ता पक्षाची वाट हाच वारीमार्ग समजून आपल्या नव्या विठ्ठलाला दंडवत घातला. आता पक्षांतरबंदी कायद्या अंतर्गत दादांवर कारवाई होऊ शकणार नाही हेही त्यातून स्पष्ट झाले. पण जरंडेश्वर त्यांची पाठ सोडायला तयार नाही असे दिसते. आजच्या घडीला त्यांच्या इतका फायद्यातील व्यक्ती इतर कोणीही नाही. दोन्ही सत्ता काळात उपमुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर आता दादांना मुख्यमंत्रीपदाचे प्रमोशनसुद्धा मिळण्याची शक्यता आहे. 40 पेक्षा कमी आमदार फोडून आणि एकनाथ शिंदे यांच्या इतकी दिव्य कामगिरी केलेली नसली तरी सुद्धा दादांना विधानसभेला 90 जागा सोडतील. आणखी काही मंत्री केले जातील असे दादांनी स्वत:च जाहीर केले आहे. त्याचा भाजपने इन्कार केला नाही. दुसरीकडे या सगळ्या घडामोडींमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तंबूत खळबळ माजली आहे. बच्चू कडूंना चूक समजली, गोगावले अर्ध्या भाकरीची अपेक्षा करु लागले. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत शिंदेसेनेचे मंत्री आणि आमदार यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचे आणि त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी दौरा अर्धवट सोडून शिंदेंना परत यावे लागल्याचे स्पष्ट झाले. आल्यानंतर दादांना घेणे कशी तातडीची गरज होती आणि आपणाला मोदी, शहा यांनी काय शब्द दिला आहे याची त्यांनी कल्पना दिली. मात्र आता आम्हाला मंत्रीपदे मिळणार नसतील तर आहे त्यांना राजीनामा द्यायला लावून आमची सोय लावा असा आग्रह काहींनी धरल्याचे समजते. शिंदेंची तारेवरची कसरत सुरू आहे. पुढच्या आठवड्यात आमचा शपथविधी होईल असे त्यांनी सांगून टाकले आहे. ठाकरे सेनेने याबाबत शपथविधीचे पत्र मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यपालांना दिले होते का? असल्यास ते पत्र जाहीर करावे अशी मागणी केली आहे. ते पत्र नसेल तरीही आणि आहे असे जाहीर केले तरीही शिंदे अडचणीत येणारच आहेत. याच दरम्यान स्वत: मुख्यमंत्री राजीनामा देणार अशी चर्चा उठली आणि त्याचा त्यांनी इन्कारही केला आहे. या दरम्यान शिंदे सेनेने विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना ठाकरे सेनेतून फोडून आपल्या पक्षात आणून ठाकरे सेनेच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
राज्यात भाजप भक्कम होत असताना दोन ठाकरेंच्या एकत्रीकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. पदाधिकाऱ्यांनी राज यांना ठाकरेसेनेशी जुळवून घेण्याचा आग्रह केल्याचे तसेच निकटवर्तीय अभिजीत पानसे यांनी संजय राऊत यांच्याशी सेना-मनसे युतीची चर्चा केल्याचे बोलले गेले त्याचा राज ठाकरे यांनी इन्कार केला आहे. मुंबईतील अस्तित्व टिकवण्यासाठी कोण कोणते अंडरस्टँडिंग करेल ते लवकरच उघडकीस येईल. राज यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आधीच्या चर्चेला विराम दिला आहे. या सर्वात काँग्रेस बळकट दिसू लागताच त्याचेही पंधरा आमदार फुटणार अशी हवा उठली. प्रत्यक्षात तीस आमदार फुटले तरच काँग्रेसमधील पक्षांतर यशस्वी होऊ शकते. या सगळ्यात गोची झाली आहे ती मूळ भाजप आणि फडणवीस यांच्या मदतीला धावून पवार कुटुंबियांवर तोंडसुख घेणाऱ्या सर्वच मित्र पक्षातील नेत्यांची. दादा भाजपशी जोडले जाताच अनेकांनी त्यांच्याशी जुळवून घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र भाजपचा या पुढचा चेहरा मराठा असेल असे खाजगीत बोलणारे भाजप नेते, वर्षानुवर्षे पक्षासाठी पवारांच्या राजकारणाशी दोन हात करणारे भाजपाई या महायुतीमुळे अडचणीत आले असून तरीही ते गप्प आहेत. समरजीत घाटगे यांनी कागलमध्ये जसे शक्ती प्रदर्शन केले तसे करण्यासही भाजपाई धजावले नाहीत हा त्यांच्या दुर्बळपणाचा पुरावाच ठरावा. राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून सुद्धा आपला पक्ष आपल्याला न्याय मिळवून देऊ शकत नाही ही भावना एकीकडे आणि इतिहासात जमले नाही ते एका वर्षात दोन प्रमुख पक्ष फोडून दाखवल्याची भावना एकीकडे. अशा द्वंद्वात भाजप अडकले आहे. आपल्या पक्षाला सावरण्यासाठी शरद पवार उत्तर महाराष्ट्रातून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करत आहेत. आजच त्यांचा दौरा सुरू होईल. पहिला वार भुजबळांवर होईल. दुसरीकडे दहा तारखेपासून उद्धव ठाकरे विदर्भातील पाच जिह्यांच्या दौऱ्यावर आहेत. आपला पक्ष सावरण्यासाठी दोघांना सहानुभूती टिकवून ठेवणे आणि निवडणूक जिंकतील असे उमेदवार शोधण्याचे आव्हान आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पंधरा दिवसात वंचितशी युतीचा निर्णय घेण्याचे अल्टिमेटम दिले असले तरी आता पवारही त्यांना सामावून घेण्यास तयार होतील अशी शक्यता आहे.
शिवराज काटकर









