काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप : संघालाही केले लक्ष्य
वृत्तसंस्था/ पुंछ
जम्मू-काश्मीरच्या पुंछ येथे काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रचारसभा घेतली आहे. यादरम्यान राहुल गांधी यांनी भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. भाजप आणि संघ देशभरात द्वेष आणि हिंसा फैलावत आहेत. भाजप अन् संघाला केवळ द्वेष फैलावणेच येते आणि त्यांचे राजकारण द्वेषाचे आहे. द्वेषावर द्वेषाने मात करता येत नाही, तर प्रेमाने द्वेष दूर करता येतो असे उद्गार राहुल गांधी यांनी काढले आहेत.
जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा राज्याचा दर्जा देण्यात यावा ही आमची पहिली मागणी आहे. हे काम करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारवर दबाव टाकणार आहोत. भाजप सरकारने पूर्ण राज्याचा दर्जा न दिल्यास आम्ही तो मिळवून देऊ. नरेंद्र मोदींनी पूर्ण देशात बेरोजगारी निर्माण केली आहे. मोदी सरकारने दुसरीकडे स्वत:च्या मित्रांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज माफ करविले असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
जम्मू-काश्मीरचे सरकार येथील लोकांनी चालवावे अशी आमची इच्छा आहे, परंतु येथील सरकार सध्या दिल्लीतून चालविले जात आहे. जनतेचे सरकार श्रीनगर आणि जम्मू येथे चालविले जाण्याची गरज आहे. भाजप नेहमीच लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहे. आमचे पहाडी बंधू अन् गुर्जर बंधूंना परस्परांमध्ये लढविण्याचे काम भाजप करत आहे. आमच्यासाठी सर्व लोक एकसारखे असून कुणालाही आम्ही मागे सोडणार नाही. आम्ही सर्वांना प्रेमाने सोबत घेऊन वाटचाल करणार आहोत असे म्हणत राहुल गांधी यांनी उपस्थित जनसमुदायाला काँग्रेस उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले.
येथील लोक केंद्र सरकारसमोर जे मुद्दे उपस्थित करू इच्छितात, ते मी संसदेत उपस्थित करणार आहे. सध्या विरोधी पक्ष जे काही करवू इच्छितात तेच घडत आहे. मोदी सरकार कायदा आणते, मग आम्ही त्याच्या विरोधात उभे ठाकतो, मग मोदी सरकार युटर्न घेते. नरेंद्र मोदींचा आत्मविश्वास संपुष्टात आला आहे. नरेंद्र मोदी पूर्वी जसे होते तसे आता राहिले नाहीत असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.









