मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
सांखळी : सांखळी नगरपालिका क्षेत्रातील विकासकामांना फास्टट्रेकवर पुढे नेण्यासाठी सांखळीत नगरपालिकेवर भाजपप्रणीत पॅनल स्थापन व्हायला हवे. कारण या पालिका क्षेत्रातील अनेक विकासकामांची सूचना दिल्यानंतर त्याविषयीचे ठराव कोणत्याही अडथळ्याविना घेण्यात यावे. आणि सदर विकासाला गती मिळावी यासाठी सांखळीत भाजपप्रणीत पॅनल स्थापन व्हावे यासाठी आपण प्रयत्नरत आहे. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. सांखळीत गेली पाच वर्षे तसेच आपण मुख्यमंत्री बनल्यानंतर केलेल्या विकासकामांमुळे सांखळीतील जनतेचा भाजपवर विश्वास दृढ झालेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला दहापैकी दहा जागांमध्ये विजय मिळणार आणि भाजपची सत्ता स्थापन होणार, असा विश्वासही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. साखळी नगरपालिका क्षेत्रात या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण प्रभागांमध्ये प्रचारासाठी फिरलो नाही. परंतु सर्व प्रभागांमधील अहवाल घेऊन संबंधित उमेदवार मार्गदर्शन करून सूचना देत आहे. पालिकेतील सर्व राजकीय घडामोडींवर आपण लक्ष ठेवून आहे. सध्याची राजकीय परिस्थिती व भाजपला मिळत असलेला प्रतिसाद पाहता यावेळी सांखळीत भाजपचीच सत्ता स्थापन होणार, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे.









