पुणे / प्रतिनिधी :
पूर्वी भाजप हा पक्ष होता. आता भारतीय जनता लाँड्री आहे. या पक्षात गेल्यानंतर एकतर क्लीनचीट मिळते किंवा व्यक्ती क्लीन होते, अशी खोचक टीका राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी रविवारी येथे केली.
सुप्रिया सुळे सध्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, रविवारी त्यांनी पुण्यातील हवेली तालुक्याला भेट दिली. या वेळी त्यांनी उरुळी देवाची येथील सावली हौसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, अंधेरी पोटनिवडणुकीबाबतचे भाजपाचे राजकारण दुर्दैवी आहे. एखाद्या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यावर त्याच्या कुटुंबामधील पत्नी किंवा इतर सदस्य निवडणूक लढू इच्छित असेल, तर इतक्या टोकाची भूमिका घेणे योग्य नाही. ही आपली भारतीय संस्कृती नाही. ज्यांनी भाजपला वाढवलं ते खरे कार्यकर्ते आज कुठं आहेत? पक्षात दिसतात ते सगळे इतर पक्षातून आलेले आहेत. भाजप नेत्यांकडे आता बोलण्यासाठी आता काहीही उरले नाही, त्यामुळे त्यांची दडपशाही सुरू आहे. पवारांवर टीका केल्याशिवाय विरोधकांचा दिवसच जात नाही.
अधिक वाचा : सरकारमधील मंत्र्यांना सत्तेचा माज; त्यांना शेतकऱ्यांशी देणंघेणं नाही
पुणे शहराची एक वेगळी ओळख होती. मात्र, मागील पाच वर्षांत महापालिकेतील सत्ताधारी पुणेकरांना पायाभूत सुविधा देण्यात अपयशी ठरले आहेत. भाजपाने ‘पुणे बदलतंय’ अशी टॅगलाईन केली होती. ती अगदी बरोबर ठरली. जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसत असून, पावसाळय़ात रस्त्यावर पाणी साचल्याचे आपल्या दिसून येत आहे. त्यामुळे त्यांची टॅगलाईन अगदी बरोबर आहे. नियोजनाच्या अभावामुळे पुणेकरांना त्रासाला सामोरे जाव लागत आहे, असा आरोपही त्यांनी केला.








