सनातन धर्मावरील वक्तव्यानंतर उदयनिधी स्टॅलिन पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूचे क्रीडा मंत्री आणि द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी भाजपची तुलना विषारी सापाशी केली असून त्याला तामिळनाडूतून हाकलण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले आहे. यापूर्वी हिंदू धर्म आणि सनातनवर वादग्रस्त वक्तव्य अंगलट आल्यानंतर आता उदयनिधी यांच्या या विधानावरूनही गदारोळ होण्याची शक्मयता आहे.
सनातन धर्मावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी विरोधकांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ‘भाजप म्हणजे विषारी साप’ असे वक्तव्य कऊन उदयनिधी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. उदयनिधी यांनी भाजपची तुलना विषारी सापाशी करण्याबरोबरच त्यांचा मित्रपक्ष अण्णाद्रमुकवरही निशाणा साधला. अण्णाद्रमुकला त्यांनी ‘कचऱ्याचा ढीग’ असे म्हटले आहे. त्यांनी रविवारी कु•ालोर जिल्ह्यातील नेवेली येथे द्रमुकचे आमदार सभा राजेंद्रन यांच्या कौटुंबिक लग्न सोहळ्याला हजेरी लावली होती. तिथे त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
लोकसभा खासदार आणि द्रमुकचे उपसरचिटणीस ए. राजा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना सापाशी केल्यानंतर काही दिवसांनी उदयनिधी स्टॅलिन यांचे वक्तव्य आले आहे. जर एखादा विषारी साप तुमच्या घरात शिरला तर त्याला फक्त फेकून देणे पुरेसे नाही. कारण तो तुमच्या घराजवळील कचऱ्यात लपून बसू शकतो. तुम्ही झाडी साफ करत नाही तोपर्यंत साप तुमच्या घरी परततच राहील, असे उदयनिधी स्टॅलिन यांनी सांगितले. तसेच 2024 च्या निवडणुकीत भाजप आणि एआयडीएमके यांना तामिळनाडूतून हद्दपार केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी समर्थकांना केले आहे.
उदयनिधी स्टॅलिन यांनी पुढे म्हटले आहे की, आपल्या सनातन धर्माच्या टिप्पणीवरून चुकीचा अर्थ काढला गेला आहे. आपले वक्तव्य नरसंहाराशी नाहकपणे जोडलं गेले. माझ्या शब्दांचा विपर्यास करून चुकीचे वक्तव्य पसरविण्यात आले. गेल्या पाच महिन्यांपासून भाजपचे सरकार असलेल्या मणिपूरमध्ये शेकडो लोक मारले गेले, तेथे नरसंहार होत आहे. पण त्याबद्दल कोणीही काहीही बोलत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
…काय म्हणाले उदयनिधी?
साप कचऱ्यात रेंगाळतो आणि आपल्या घरात घुसतो. सापांचा नायनाट करायचा असेल तर कचराही शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. 2024 मध्ये तामिळनाडूतून भाजप आणि अण्णाद्रमुकला हटवण्यासाठी लोकांनी तयार रहावे.









