वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांची माहिती : अनेक अल्पसंख्याक नेते आज भाजपासोबत
पणजी : भाजप अल्पसंख्याकांच्या विरोधात असल्याचा खोटा प्रचार करत काँग्रेसने केवळ मतपेटीचे राजकारण केले, मात्र प्रत्यक्षात अल्पसंख्य समाजाला विकासापासून वंचित ठेवले. भाजपने कोणताही भेदभाव न करता विविध योजना राबविल्या आहेत. भाजप अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही, म्हणूनच अनेक अल्पसंख्याक नेते आज भाजपासोबत आहेत. अनेक अल्पसंख्याक लोक उघडपणे भाजपाला पाठिंबा देत आहेत, तर काहीजण मूक मतदानाद्वारे भाजपाला आणि पर्यायाने पंतप्रधान मोदी यांना साथ देण्याची ग्वाही देत आहेत. त्यामुळे उत्तर गोव्यात 1 लाख, तर दक्षिण गोव्यात 50 हजार मतधिक्याने दोन्ही भाजपचे उमेदवार निवडून येतील, असे चित्र स्पष्ट दिसत आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली येथील भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत गुदिन्हो बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक, प्रेमानंद म्हांबरे उपस्थित होते.
मुस्लीमांसाठी राबविल्या योजना
भाजपाच्या गेल्या दहा वर्षांचा इतिहास पाहिल्यास मुस्लीम विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती तिप्पट झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साऊदी अरेबियाशी चर्चा करून भारतातून धार्मिक पर्यटन करणाऱ्या मुस्लीम बांधवांसाठीचा कोटा तीन पटीने वाढवून घेतला आहे.
जुने गोवेत दिल्या जागतिक सुविधा
कै. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना जुने गोवे येथील शवप्रदर्शन सोहळ्यावेळी जागतिक दर्जाची व्यवस्था उपलब्ध केली होती. आताही उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष असलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शवप्रदर्शन सोहळ्यात चोख व्यवस्था आणि सुविधांसाठी 71 कोटी ऊपयांची कामे निश्चित केलेली आहेत.
विदेशांतील गोवेकरांना दिला दिलासा
ओसीआय कार्डप्रश्नी केंद्राने घेतलेल्या निर्णयामुळे विदेशात असलेल्या गोमंतकीयांना दिलासा मिळाला आहे. दुहेरी नागरिकत्वाच्या विषयावर सुद्धा योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असा विश्वास माविन गुदिन्हो यांनी व्यक्त केला.
… यातच भाजपाचा धर्मनिरपेक्षपणा येतो
सुमारे 80 टक्के हिंदू लोक असलेल्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व आपण करत आहे, यातच भाजपाचा धर्मनिरपेक्षपणा येतो. मी काँग्रेसमध्ये असतानाही नरेंद्र मोदींचा चाहता होतो. आज जागतिक स्तरावर मान असलेले नरेंद्र मोदी यांना गोव्याप्रती आस्था आहे. येत्या लोकसभेत गोव्यातील दोन खासदार नक्की असणार यात शंका नाही. पंतप्रधानांकडून गोव्यासाठी केंद्रीय मंत्रिपदाच्या ऊपात विशेष बक्षीस मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
काँग्रेसने फक्त बसविल्या कोनशिला
एकीकडे इतर राज्यात कोळसा जाळून त्यातून निर्माण होणारी वीज विना प्रदूषण गोव्यात येत असल्यास त्यालाही काहीजण विरोध करत आहेत. दुसरीकडे काँग्रेसच्या काळात अनेक प्रकल्पांच्या केवळ कोनशिलाच बसवण्यात आल्या आणि प्रत्यक्षात कामे झालीच नाही. या कोनशिलांचा वापर करून एखादा प्रकल्प उभारला जाऊ शकतो, असा टोला माविन गुदिन्हो यांनी हाणला. भाजपाच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण गोव्यात येऊन गेले. गृहमंत्री अमित शहा उद्या उत्तर गोव्यात येत आहेत. काँग्रेसचा मात्र एकही मोठा नेता गोव्यात आलेला नाही. यावरून ते गोव्याला किती महत्त्व देतात हे दिसून येते, असे ते शेवटी म्हणाले.









