ऑनलाईन टीम / तरुण भारत :
महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनानंतर भाजपचे हायकमांड भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात ऍक्शन मोडवर आले आहे. त्यांनी ब्रिजभूषण सिंह यांना तंबी देत वादग्रस्त वक्तव्ये टाळण्याची सूचना केली आहे.
ब्रिजभूषण सिंह 5 जून रोजी अयोध्येत जनजागृती रॅली काढणार होते. या रॅलीमध्ये 11 लाख लोक त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. पण भाजप हायकमांडच्या आदेशानुसार त्यांनी ही रॅली रद्द करत असल्याची घोषणा फेसबुक पोस्टद्वारे केली आहे.
ब्रिजभूषण यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझ्या प्रिय शुभचिंतकांनो! तुमच्या पाठिंब्याने मी गेली 28 वर्षे लोकसभेचा सदस्य म्हणून काम केले आहे. मी सत्तेत असताना आणि विरोधात असताना सर्व जाती, समाज आणि धर्माच्या लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. याच कारणांमुळे माझे राजकीय विरोधक आणि त्यांच्या पक्षांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. सध्याच्या परिस्थितीत काही राजकीय पक्ष ठिकठिकाणी मोर्चे काढून प्रांतवाद, प्रादेशिकवाद आणि जातीय संघर्ष वाढवून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी संपूर्ण समाजात पसरलेल्या तिरस्काराच्या भावनांवर विचारमंथन करण्यासाठी 5 जून रोजी अयोध्येत संत संमेलन घेण्याचे ठरले होते. पण पोलीस माझ्यावरील आरोपांची चौकशी करत असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा आदर करत 5 जूनला होणारी ‘जन चेतना’ महारॅली आणि ‘अयोध्या चलो’ कार्यक्रम काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात येत असल्याचे ब्रिजभूषण यांनी म्हटले आहे.









