पणजी : भाजपमध्ये ऊजू होत नाही म्हणून आपल्या बदनामीचे षडयंत्र रचले असल्याचा दावा करणारे आम आदमी पार्टीचे गोवा प्रदेश अध्यक्ष अॅड. अमित पालेकर हे सरळसरळ खोटे बोलत असून एखाद्या व्यक्तीला पक्षात घेण्यासाठी अशी खेळी खेळण्यास भाजप एवढा लाचार झालेला नाही, असा टोला पक्षाचे सचिव दयानंद सोपटे यांनी लगावला आहे. काल शुक्रवारी पणजीत पक्षकार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी माजी मंत्री दिलीप पऊळेकर, उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष महानंद अस्नोडकर आणि ओबीसी मोर्चा प्रमुख गिरीश उसकईकर यांचीही उपस्थिती होती. बाणस्तारी अपघात प्रकरणात अमित पालेकर यांना करण्यात आलेल्या अटकेसाठी त्यांनी भाजपला जबाबदार धरले असून, आपण भाजपात ऊजू होत नसल्याचा वचपा काढण्यासाठी व आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी हे षडयंत्र रचल्याचा आरोप केला होता. परंतु हा प्रकार म्हणजे ’वडाची साल पिंपळाला’ लावण्यासारखा आहे. स्वत: वकील असलेल्या अमित पालेकर यांनीच हा बनाव रचला आहे, असा प्रतिआरोप सोपटे यांनी केला.
मृतांसाठी काही करायला हवे होते
बाणस्तारी अपघात प्रकरणात खरे तर पालेकर यांनी जे मृत झाले त्यांच्या समर्थनार्थ काहीतरी करायला हवे होते. परंतु त्यांनी आरोपींच्या बचावासाठी धाव घेतली. आता ते भाजपवर बिनबुडाचे आरोप करत आहेत. यातून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे भाजप त्यांची प्रतिमा मलीन करत नाही तर भाजपवर आरोप करून पालेकर स्वत:चा टीआरपी वाढविण्याचे प्रयत्न करत आहेत, असा दावा सोपटे यांनी केला.
ऑफर देणाऱ्यांची नावे जाहीर करावी
पालेकर यांना भाजपकडून जर खरोखरच पक्षप्रवेशाची ऑफर आली होती तर ती ऑफर देणाऱ्याचे नाव त्यांनी जाहीर करावे. उगीच स्वत:ची राजकीय प्रतिमा उंचावण्याचे प्रयत्न करू नयेत. भाजपने कधीच कुणालाही धमकी देऊन, ब्लॅकमेल करून पक्षात प्रवेश दिलेला नाही. आमच्याकडे केंद्रात तसेच राज्यातही मुबलक नेते आणि कार्यकर्ते आहेत, असे सांगून, भाजप एवढा लाचार झालेला नाही, याचा सोपटे यांनी पुनऊच्चार केला.









