वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी इंडी आघाडीतील घटकपक्ष आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. बुधवारी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि आप राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी अरविंद केजरीवालांना देशविरोधी म्हणणाऱ्या अजय माकन यांच्यावर 24 तासांत कारवाई करावी अन्यथा निर्णय घेऊ असा इशारा काँग्रेसला दिला. यामुळे इंडी आघाडीत फूट पडण्याचे संकेत यामुळे मिळाले आहेत. दिल्ली निवडणुकीकरता भाजपकडून काँग्रेसला वित्तपुरवठा केला जात आहे. संदीप दीक्षित यांना भाजपकडून पैसे मिळत आहेत. संदीप दीक्षित यांना निवडणूक लढविण्यासाठी कुठून पैसे मिळत आहेत हे काँग्रेसने सांगावे. काँग्रेसचे नेते सध्या भाजपची पटकथा वाचत आहेत. अरविंद केजरीवालांच्या विरोधात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. काँग्रेसने कधी भाजपच्या विरोधात एफआयआर नोंदविला आहे का, असे प्रश्नार्थक विधान आतिशी यांनी केले आहे.
काँग्रेसने कारवाई करावी
काँग्रेस दिल्लीत भाजपला विजय मिळवून देऊ पाहत आहे. काँग्रेस नेतृत्व या कटात सामील नसेल तर संबंधित नेत्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी. आम आदमी पक्ष जर देशविरोधी असेल तर काँग्रेसने आमच्यासोबत आघाडी करत लोकसभा निवडणूक का लढली होती? काँग्रेस नेत्यांनी आम आदमी पक्षाला पराभूत करण्यासाठी दिल्लीत भाजपसोबत राजकीय तडजोड केल्याचा आरोप आतिशी यांनी केला.
भाजप ठरवतेय काँग्रेसचे उमेदवार
माकन यांच्या विरोधात कारवाई न झाल्यास आप इंडी आघाडीतील सहकारी पक्षांना काँग्रेसची हकालपट्टी करण्यास सांगणार आहे. दिल्ली निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांची यादी भाजपकडुन तयार करण्यात आल्याचे वाटू लागले आहे. आम आदमी पक्षाला नुकसान पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा सिंह यांनी केला.
भाजपच्या हातचे बाहुले माकन
काँग्रेस नेते माकन यांनी अरविंद केजरीवालांना देशविरोधी संबोधिले आहे. काँग्रेसने त्यांच्यावर 24 तासांच्या आत कारवाई करावी. माकन हे भाजपने लिहिलेली पटकथा वाचत आहेत, असा दावा संजय सिंह यांनी केला आहे.
माकनांकडून आप लक्ष्य
‘आप’ला समर्थन आणि आघाडी करणे आमची चूक होती. 2013 मध्ये आप सरकारला आम्ही 40 दिवसांसाठी समर्थन दिले होते, याचमुळे दिल्लीची दुर्दशा झाली आहे. आपसोबत आघाडी करण्याची शिक्षा दिल्लीवासीय भोगत आहेत. याचमुळे काँग्रेस दिल्लीत कमकुवत झाल्याचे म्हणत माकन यांनी केजरीवालांना देशविरोधी संबोधिले होते.









