भाजपचा दावा : बहुतांश ठिकाणी बिनविरोध निवडी,मुख्यमंत्री, सभापती, आमदारांचे वर्चस्व आमदार, मंत्र्यांसह साजरा केला आनंद

प्रतिनिधी /पणजी
अलिकडेच निवडणूक झालेल्या 186 पंचायतींपैकी 128 पंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला असून तेथे भाजपच्या सत्तेसह सरपंच, उपसरपंचपदी भाजप समर्थकांची निवड झाली आहे. त्याशिवाय अन्य ठिकाणी काही पंचांची जमवाजमव करून एकूण 150 पंचायतींवर दोन्ही पदांच्या रुपात भाजपने वर्चस्व स्थापन केल्याचे चित्र आहे. उर्वरित पंचायतींवर काँग्रेससह इतर विरोधी पक्षीय तसेच अपक्ष असलेले उमेदवार सरपंच-उपसरपंच झाल्याचे समोर आले आहे. अनेक पंचायतींवर दोन्ही पदांसाठी बिनविरोध निवड झाली.
ज्या पंचायतीमध्ये निवडणूक झाली तेथे अपक्ष पंचांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे दिसून आले. बहुतेक पंचायतीवर मंत्री व आमदारांनी (प्रामुख्याने सत्ताधारी) आपापल्या पंचाना दोन्ही पदांवर बिनविरोध निवडून आणून आपले वर्चस्व गाजवल्याचे दिसून आले.
बहुतांश ठिकाणी बिनविरोध निवडी
राज्यातील 186 पंचायतीवर सरपंच-उपसरपंच निवडीसाठी काल सोमवारी पंचायत कार्यालयात नवीन पंचायत मंडळाच्या बैठका घेण्यात आल्या. सकाळी प्रथम दोन्ही पदांसाठी अर्ज सादर करण्यात आले. त्यासाठी दिलेल्या मुदतीत अनेक पंचायत मंडळ बैठकीत दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने त्या पदांची निवड बिनविरोध झाली. काही बैठकीत दोन दोन अर्ज आल्यामुळे निवडणूक घ्यावी लागली. मामलेदार कार्यालयातून पंचायत मंडळाच्या बैठकीला दोन्ही पदाच्या निवडीसाठी निर्वाचन अधिकारी पाठवण्यात आला होता.
मुख्यमंत्री, सभापती, आमदारांचे वर्चस्व
पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी तेथील बहुतेक सर्व पंचायतीवर आपलेच उमेदवार सरपंच, उपसरपंच झाल्याचा दावा केला आहे. सांखळी मतदारसंघातील सर्व पंचायतीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे समर्थक सरपंच, उपसरपंच झाले आहेत. काणकोण तालुक्यातही सभापती रमेश तवडकर यांनी त्यांच्या क्षेत्रातील बहुतेक पंचायतीवर आपले सरपंच, उपसरपंच निवडून आणले आहेत.
आमदार, मंत्र्यांसह साजरा केला आनंद
या निवडीनंतर अनेक आमदार, मंत्र्यांनी आपल्या मतदारसंघातील निवनियुक्त पंचायत मंडळावरील सरपंच-उपसरंपचांचे पुष्पगुच्छ देऊन, गळय़ात हार घालून त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्यासह फोटो काढून ते सोशल मीडियावर प्रसारित केले. पंच सदस्य निवडणुकीत जसे विरोधी उमेदवारांचे पानिपत झाले तसेच सरपंच-उपसरपंच निवडणुकीत होऊन विरोधी पक्षीय पंचांना दोन्ही पदांसाठी मुकावे लागले. भाजपने पंचायत मंडळासह दोन्ही पदेही काबिज केली असून कळंगूट पंचायतीत तर माजी मंत्री मायकल लोबो यांना जोरदार धक्का बसला आणि भाजपचे जोसेफ सिक्वेरा सरपंच झाल्याचे समोर आले आहे.
दक्षिण गोव्यात काँग्रेसने तग धरली
उत्तर गोव्यातील बहुतांश पंचायतींवर भाजपने आपले सरपंच, उपसरपंच बिनविरोध निवडून आणण्यात यश मिळविले आहे. दक्षिण गोव्यात काँग्रेसने काही प्रमाणात तग धरली असून काही पंचायतींवर त्याचे सरपंच, उपसरपंच निवडून आले आहेत. तथापि ते कधी फिरतील, किंवा बदलतील याचा काही नेम नाही. एकंदरीत परिस्थितीत पंचायत निवडणुकीत आणि सरपंच, उपसरपंच निवडणुकीत काँग्रेसचे प्राबल्य कमी होत असल्याचे दिसून आले. या निवडणुकीचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीवर दिसणार, अशी चिन्हे आहेत.
अनेक पंचायतींमध्ये महिलांना जणू लागल्या लॉटऱया
सरपंच, उपसरपंच अशा दोन्ही पदांचा लाभ नवीन चेहऱयांना झाला असून अनेक महिला पंचांना त्या पदांची जणू काही लॉटरीच लागली आहे. काही पंचायतीवर जुने प्रस्थापित निवडून आले असले तरी त्यांना नवीन पंचांनी या दोन्ही पदांसाठी दूर ठेवल्याचे स्पष्ट होत आहे. सरपंच उपसरपंचांचा शपथग्रहण सोहळा लवकरच होणार असल्याचे सांगण्यात आले.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून सरपंच, उप सरपंचांचे अभिनंदन
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी गोव्यातील सर्व नवनिर्वाचित सरपंच आणि उप – सरपंच यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. लोकांचा विश्वास संपादन करताना विकासाची पहिली पायरी मानल्या जाणाऱया ग्रामपंचायतीचे माध्यम आपण सर्वांनी निवडले आहे, याबद्दल पुनःश्च सर्वांचे अभिनंदन, असे नाईक यांनी म्हटले आहे.
आज खऱया अर्थाने तुम्ही सर्वांनी लोकप्रतिनिधीचा मुकुट धारण केला आहे. लोकहिताच्या कटीबद्धतेची पवित्र शपथ घेताना, आपली जबाबदारी पार पाडताना ’सबका साथ, सबका विकास और सबका प्रयास’, हा देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा मंत्र सतत स्मरणात ठेऊया आणि निवडणुकीचा उदात्त हेतू नजरेसमोर ठेवून वैरभावाला तिलांजली देत स्वतःला विकासाच्या प्रवाहात झोकून देऊया, असे शुभेच्छापूर्वक आवाहन श्रीपाद नाईक यांनी केले आहे.









