नगराध्यक्षपदी रितेश नाईक तर दीपा कोलवेकर उपनगराध्यक्ष
फोंडा : फोंडा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपाचे रितेश नाईक यांची तर उपनगराध्यक्षपदी दीपा शांताराम कोलवेकर यांची 10 विऊद्ध 5 मतांनी निवड झाली आहे. प्रतिस्पर्धी मगो रायझिंग फोंडा पॅनेलचे शिवानंद सावंत व वेदिका विवेकानंद वळवईकर यांना फक्त 5 मते मिळाली. मंगळवारी सकाळी फोंडा पालिका सभागृहात दोन्ही पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यात अपेक्षेप्रमाणे भाजपा पॅनेलची सरशी झाली. नगराध्यक्षपदासाठी भाजपातर्फे रितेश नाईक तर मगो रायझिंग पॅनेलतर्फे शिवानंद सावंत यांनी अर्ज भरले होते. उपनगराध्यक्षपदासाठी भाजपाच्या दीपा शांताराम कोलवेकर यांनी तर त्यांच्या विरोधात वेदिका वळवईकर यांनी अर्ज भरला होता. हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यात रितेश नाईक व दीपा कोलवेकर यांना 10 तर शिवानंद सावंत व वेदिका वळवईकर यांना 5 नगरसेवकांनी पाठिंबा दर्शविला. यावेळी सर्व पंधराही नगरसेवक उपस्थित होते. फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांचीही उपस्थिती होती. तत्पूर्वी नव्याने निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना शपथ देण्यात आली.
फोंड्याचा नियोजनबद्ध विकास करणार : रितेश नाईक
आपल्या निवडीनंतर बोलताना रितेश नाईक म्हणाले, पुढील पाच वर्षे फोंड्याचा नियोजनबद्ध विकास केला जाईल. पालिका बाजार, गोल्डन ज्युबिली प्रकल्प, नियोजित मास्टर प्लॅन ही विकासकामे प्राधान्यक्रमाने हाती घेण्यात येतील. त्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, फोंड्याचे आमदार व कृषीमंत्री रवी नाईक तसेच अन्य भाजपा नेत्यांचे नेहमीच सहकार्य असेल, असेही ते म्हणाले.
निर्वाचन अधिकाऱ्याने पत्रकारांना डावलल्याने संतप्त प्रतिक्रिया
निवडणूक प्रक्रियेवेळी पत्रकारांना सभागृहात मज्जाव करण्यात आल्याने या कृतीचा निषेध करण्यात आला. निवडणूक लोकशाही मार्गाने होत असल्यास त्यात पारदर्शकता हवी. जनतेपर्यंत या गोष्टी पोचायच्या असल्यास पत्रकारांना, प्रसार माध्यमांना अशा निवडणुकीच्यावेळी बंदी घालता येणार नाही अशा खेदजनक प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केल्या. पत्रकारांनीही निर्वाचन अधिकारी रघुराज फळदेसाई यांच्या या कृतीबद्दल जमिनीवर बसून प्रतिकात्मक निषेध केला. त्यानंतर सर्व माध्यम प्रतिनिधींनी पालिका उद्यानात ठिय्या मांडला. नगरसेवक व्यंकटेश नाईक यांनी याबाबत निषेध व्यक्त केला. मंत्री रवी नाईक यांनीही नाराजी व्यक्त केली.
प्रसार माध्यमांना बंदी घालणे निषेधार्ह : व्यंकटेश नाईक
माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक व्यंकटेश उर्फ दादा नाईक यांनी प्रसार माध्यमांना सभागृहात येण्यास बंदी घालण्याचा आदेश निषेधार्ह असल्याचे सांगितले. या कृतीमध्ये कुणाचा तरी छुपा हेतू आहे. मुळात आपला नगराध्यक्ष निवडून येणार की, नाही याची भीती सत्ताधाऱ्यांना होती. त्यामुळे हात उंचावून मतदान घेण्यात आले. छुपे मतदान झाले असते तर कदाचित निकाल वेगळाही लागला असता. निवडणुकीच्यावेळी प्रसार माध्यमांची उपस्थिती आवश्यक होती. विधानसभेची अधिवेशने प्रसार माध्यमातून थेट प्रसारित केली जातात. मग पालिकेच्या निवडणुकीत त्यांना बंदी का घातली जाते ? सरकारने याची दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली.
प्रसार माध्यमांना बंदी योग्य नव्हे : रवी नाईक
मंत्री रवी नाईक यांनी नवीन पालिका मंडळाला शुभेच्छा दिल्या. निवडणूक प्रक्रिया पार पाडल्यानंतर मंत्री रवी नाईक यांनी पालिका उद्यानात येऊन पत्रकारांची भेट घेतली. प्रसार माध्यमांना सभागृहात मज्जाव करण्याची कृती योग्य नव्हती व आपल्याला ती आवडली नाही. निर्वाचन अधिकाऱ्यांना वरिष्ठांकडून तसे आदेश होते, असेही ते म्हणाले. पण कुठल्या वरिष्ठांकडून हे पत्रकारांनी निर्वाचन अधिकारी रघुराज फळदेसाई यांनाच विचारावे अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.
निष्ठांवतांची पक्षात कदर नाही !
भाजपा पॅनेलने नगराध्यक्षपदाची ही निवडणूक 10 मतांनी जिंकली तरी, भाजपातील काही नगरसेवकांची नाराजी स्पष्ट दिसून आली. या पदासाठी अन्य काही नगरसेवक दावेदार होते. त्यांना डावलले गेल्याने पक्षात निष्ठांवतांची कदर नाही, अशी प्रतिक्रिया काही नाराज नगरसेवकांनी व्यक्त केली. नगराध्यक्षपदी निवडीनंतर सामूहिक फोटोसाठीही त्यापैकी काहीजण थांबले नाहीत.









