शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात आपलेच वर्चस्व राखण्यासाठी ठाकरे सेना आणि शिंदे गट शिवसेनेमध्ये सत्तासंघर्ष सुरू आहे. मात्र, भाजपने ‘शत-प्रतिशत’ भाजपचे उद्दिष्ट ठेवत हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भाजपला आजपर्यंत लोकसभा निवडणुकीत कधीही आपला खासदार निवडून आणता न आलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे.
कोकणातील आजवरचा राजकीय इतिहास पाहिला तर जनतेने कधी काँग्रेस, कधी समाजवादी पक्ष, तर कधी शिवसेना पक्षाला साथ दिली आहे. भाजपला आजपर्यंत कोकणात संधी मिळालेली नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ही संधी निर्माण करण्यासाठी भाजपने कंबर कसायला सुरुवात केली आहे. शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीमुळे शिवसेनेच्या कोकणातील बालेकिल्ल्यात त्याची फाटाफूट झाली याच राजकीय संधीचा फायदा उठवण्यासाठी भाजपने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर दावा करायला सुरुवात केली आहे.
तळकोकणातील राजकारण गेल्या दोन दशकामध्ये पाहिले तर एका बाजुला राणे आणि दुसऱ्या बाजुला राणे विरोधक असेच स्वरुप राहिले आहे. देशात, राज्यात युती, अघाड्या कशाही असल्या तरी राणे ज्या पक्षात त्या पक्षाच्या विरोधात इतर सर्वजण एकवटलेले असेच चित्र पक्के होते. पण आता हे राजकारण हळुहळू बदलायला लागले आहे. देश आणि राज्य पातळीवरील राजकीय संघर्ष कोकणातही सुरू झाला आहे. भाजप व त्यांचे साथीदार मित्र पक्ष विरुद्ध महाविकास आघाडीतले पक्ष असा थेट पक्षीय सामना सुरू झाला आहे. भाजपसोबत असलेली शिंदे शिवसेना विरुद्ध ठाकरे सेना यांच्यात संघर्ष वारंवार पाहायला मिळत आहे.
राज्याच्या राजकारणात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि कोकणातही त्याप्रमाणे दोन गट पडले. त्यामुळे महाविकास आघाडीची ताकद कमी होऊ लागली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध एकटा पक्ष लढणाऱ्या भाजपला आता शिंदे गट शिवसेना व अजित पवार गट राष्ट्रवादीची साथ मिळाली आहे. त्यामुळे भाजपने शतप्रतिशत भाजप व महाराष्ट्रात 45 प्लस लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे.
कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार विनायक राऊत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतच राहिले आहेत. त्यामुळे ठाकरे सेना व महाविकास आघाडीकडून ते पुन्हा 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहू शकतात. मग त्यांच्या विरोधात कोण उमेदवार असेल यांची उत्सुकता आहे. 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार निवडून आले असल्याने शिंदे शिवसेना गटाकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर आपलाच दावा केला जात आहे. परंतु, शिवसेनेत फूट पडल्याने शिवसेनेची मते विभागली गेली. त्यामुळे दोन्ही शिवसेनेची ताकद कमी झालेली आहे. म्हणूनच की काय भाजपने या कोकणात आपला दावा सांगायला सुरुवात केली आहे.
शत प्रतिशतचे उद्दिष्ट गाठण्यासाठी व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावरील आपला दावा प्रबळ करण्यासाठी भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी रत्नागिरीमधील उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवावी, असे सुचित केले आहे. किरण सामंत हे राज्यातील महायुती सरकारमधील उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू आहेत आणि उद्योगमंत्री हे शिंदे गटाचे आहेत. त्यामुळे आमदार राणे यांनी किरण सामंत यांना भाजपच्या तिकिटावर लढण्याचे आवतान देवून भाजपचे शतप्रतिशतचे उद्दिष्टपूर्तीसाठी टाकलेले पहिले पाऊल म्हणावे लागेल.
आमदार राणेंनी किरण सामंत यांना भाजपमध्ये निवडणूक लढण्याचे सुचविले खरे. परंतु किरण सामंत यांना ते पटलेले नसावे. त्यामुळेच की काय त्यांनी नंतर आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल चिन्ह ठेवले आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. वेळ आली की, करारा जबाब देणार, असे सूचक वक्तव्य केले. त्यामुळे आमदार राणे यांनी भाजपमधून निवडणूक लढविण्याचे दिलेले आवाहन पटलेले नसावे किंवा भाजपच्या वरिष्ठ पातळीवरुन विचार व्हायला हवा, अशी अपेक्षा असावी असे त्यांच्या सुचक वक्तव्यातून स्पष्ट होत आहे. मात्र, त्यांच्या वक्तव्याने भाजप आणि शिंदे गटात लोकसभा मतदार संघावर केल्या जाणाऱ्या दाव्यावरुन सुप्तसंघर्ष सुरू असल्याचेही स्पष्ट झाले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना खासदार विनायक राऊत यांना निवडून आणण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांनी मोठी ताकद लावली होती. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातून खासदार राऊत यांना मोठे मताधिक्यही मिळू शकले. किरण सामंत उद्योजक असल्याने निवडणूक काळात रसद पुरविण्याचे कामही केलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही त्यांनी देवगड सारखी महत्त्वाची नगरपंचायत आपल्या ताब्यात मिळविण्यात यश मिळविले. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी किरण सामंत यांच्या नावाची चर्चा पुढे आली आहे.
एकीकडे शिंदे शिवसेना गटाकडून किरण सामंत यांचे नाव पुढे आलेले असताना महायुती सरकारमधील शिंदे गटात असेले शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी लोकसभा निवडणुकीची इच्छा दर्शविली. किंबहुना भाजपच्या तिकटावर निवडणूक लढविण्यासाठीही त्यांचे प्रयत्न सुरू असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. न•ा यांची भेटही घेतल्याची राजकीय सुत्राकडून माहिती उपलब्ध झाली आहे. केसरकर हे अतिशय शांत व अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांना उतरविण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरुन त्यांना वरदहस्त मिळत आहे. भाजपलाही शतप्रतिशत उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्येक मतदार संघ हवाच आहे. त्यामुळे भाजपमधला नाही तर मित्र पक्षातील उमेदवार भाजपच्या तिकिटावर लढवून निवडून आणण्याची रणनीती आखली जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात भाजपला कोकणातला खासदार कधीही निवडून आणता आला नाही. त्यामुळे राज्यातील राजकीय सत्तासंघर्षात शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातही विरोधकांना धक्का देण्यासाठी केंद्रीयमंत्री नारायण राणे, भाजपचे आमदार प्रसाद लाड यांचीही नावे चर्चेत पुढे आणलेली आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची जबाबदारी भाजपचे केंद्रातील मंत्री अजकुमार मिश्रा सातत्याने कोकणचा दौरा करत आहेत व आपल्या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पाठबळ देत आहेत. त्यामुळे भाजपने अगोदर पासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी केलेली आहे. 2019 च्या निवडणुकीत निवडून आलेले शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यासोबत त्यावेळी भाजप होती. परंतु, आता भाजपसोबत असलेल्या शिंदे गटात खासदार राऊत नाहीत. त्यामुळे त्यांना भाजपकडून पाठबळ मिळणार नाही. तसेच 2019 च्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात काँग्रेसमधून निवडणूक लढणारे नीलेश राणे आणि राणे समर्थक भाजपमध्ये गेल्याने भाजपची ताकद वाढलेली आहे. तर महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेसची ताकद कमी झालेली आहे. राष्ट्रवादीतही दोन गट पडून अजित पवार भाजपसोबत असल्याने आघाडीतील राष्ट्रवादी गटाची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे या बेरजेच्या राजकीय गणितात कोकणात भाजपचीच ताकद वाढल्याचे चित्र दिसत आहे. प्रत्यक्ष निवडणुकीच्यावेळी कोण कुठे असेल हे सांगता येत नाही. किंवा युती आघाड्या असतील की नाही हेही सांगता येत नाही. भाजपने मात्र एक-एक सिट महत्त्वाची आहे हे ओळखून अगोदर पासूनच प्रत्येक मतदार संघाची बांधणी केली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून भाजपला आजवर आपला उमेदवार निवडून आणता आलेला नाही. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ती संधी भाजपने निर्माण केली आहे. परंतु, जागावाटपात महायुतीमध्ये शिंदे सेना गटाला जागा मिळते की भाजपला मिळते, यावर बरेच काही अवलंबून आहे. याच अनुषंगाने भाजपने शिंदे गटातील किरण सामंत, दीपक केसरकर यासारख्या उमेदवारांची भाजपमधून निवडणूक लढविण्याची चाचपणी सुरू केली आहे. शतप्रतिशत भाजपचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कधीही भाजपचा उमेदवार निवडून न आलेल्या कोकणावर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे.
संदीप गावडे








