वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजपने दिल्ली विधानसभा निवडणूक घोषित होण्यापूर्वीच पराभव मान्य केला आहे. भाजपकडे मुख्यमंत्रिपदासाठी कुठलाही चेहरा नाही. दिल्लीसाठी कोणत्याही प्रकारचे व्हिजन नाही तसेच उमेदवार देखील मिळत नाहीत. भाजप गैरप्रकार घडवून आणत निवडणूक जिंकू पाहत आहे असा आरोप आप संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
शाहदरा येथे 11 हजार मतदारांची नावे यादीतून वगळण्यासाठी भाजपने अर्ज केल्याचा आरोप केजरीवालांनी केला. भाजपचा हा डाव उघड झाल्याने निवडणूक आयोगाच्या हस्तक्षेपाद्वारे लोकांची नावे यादीतून वगळणे शक्य झाले नाही. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात भाजपने 5 हजार मतदारांची नावे रद्द करण्याचा अर्ज दिला आहे. तर दुसरीकडे भाजपने 7500 जणांची नावे मतदारयादीत सामील करण्यासाठी अर्ज दिले आहेत. 12 टक्के मतांकरता हा खेळ सुरू असल्याचा दावा केजरीवालांनी केला.
कुठल्याही मतदारसंघात 2 टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांची नावे रद्द झाल्यास निवडणूक अधिकारी तपासणी करतात. मागील दोन महिन्यांमध्ये मतदारांची नावे वगळण्यासाठी जे अर्ज दाखल झाले आहेत त्याची पडताळणी आम आदमी पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी पत्र लिहून निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. जर 4 टक्के अधिक मतदारांची नावे यादीत सामील झाली तरीही पडताळणी होते असे केजरीवाल म्हणाले.
अधिकाऱ्यांना इशारा
अधिकाऱ्यांवर वरून दबाव येईल, परंतु दस्तऐवजावर अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असेल आणि ती अनेक वर्षापर्यंत राहणार आहे. जोपर्यंत सरकार बदलणार नाही तोवर त्या फाइल्स तेथेच राहतील. याचमुळे चुकीचे काम अधिकाऱ्यांनी करू नये. कायद्यानुसार काम केले तर अडचणीत येणार नाही, अन्यथा अधिकारीच गोत्यात येतील, फोन करणारे तेव्हा मदतीला धावून येणार नाहीत असा इशारा केजरीवालांनी दिला आहे.
भाजप निवडणुकीत पराभूत होत असल्यानेच मतदारांची नावे रद्द करा, पैसे वाटून मतदारांना खरेदी करण्याचा डाव भाजपने रचला आहे. दिल्लीत एकही मतदाराचे नाव रद्द होऊ नेणार नाही. भाजप महिला सन्मान योजना रोखू इच्छित आहे, परंतु निवडणुकीनंतर आम्ही महिलांना दर महिन्याला 2100 रुपये देणार आहोत असा दावा केजरीवालांनी केला.









