न्हावेली / वार्ताहर
BJP District President Rajan Teli’s visit to Malgaon Secretariat!
विविध विकास कामांवर चर्चा : सहकार्याचे आश्वासन
भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी मळगाव गावच्या नूतन सचिवालयास भेट दिली. यावेळी त्यांनी मळगाव गावातील विविध विकास कामांबाबत चर्चा केली. तसेच जिल्हा नियोजनच्या माध्यमातून गावातील आवश्यक विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर व सहकाऱ्यांना दिली.
मळगांव सरपंच सौ. स्नेहल जामदार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा बँक संचालक महेश सारंग, गुलाबराव गावडे आदी उपस्थित होते.यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ गावकर यांनी मळगाव, ब्राह्मणपाट व कुंभार्ली येथील विविध समस्या राजन तेली यांच्यासमोर मांडल्या. विशेषतः गावातील रस्ते, पूल, कॉजवे व पाणी पुरवठा याकडे त्यांनी लक्ष वेधले.
यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सोबत चर्चा करून जिल्हा नियोजनच्या बैठकीत या सर्व गोष्टींचा समावेश करून सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे काम करेन व येणाऱ्या वर्षभरात आपल्या गावाची प्रगतीकडे वाटचाल असेल, अशी ग्वाही दिली. गाव प्रगतीपथावर नेण्यासाठी आपापसात मतभेद न ठेवता गावाचा सर्वांगीण विकास कसा होईल ते पाहावे जेणेकरून मळगाव विकासापासून मागे जाणार नाही याची सर्व सदस्यांनी काळजी घ्यावी, असेही तेली यांनी यावेळी स्पष्ट केले.









