भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांची मागणी : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलव्दारे निवेदन पाठविले
कोल्हापूर प्रतिनिधी
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीवर कायम स्वरूपी सचिवाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी शहर भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी या मागणीचे निवेदन ई-मेलव्दारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.
निवेदनात म्हटले आहे की : देवस्थान समितीच्या कार्यक्षेत्रात अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर आणि इतर अशी तीन हजारपेक्षा जास्त मंदिरे आहेत. कार्यक्षेत्राचा मोठा आवाका असल्याने समितीचे अध्यक्ष, सचिव यांच्याकडे मोठी जबादारी असते. परंतु सध्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव पद रिक्त असून त्याजागी प्रभारी म्हणून सुशांत बनसोडे (प्रांत राधानगरी , कागल विभाग) हे कार्यरत आहेत. आपल्या विभागाचे काम पाहून त्यांना देवस्थान समितीच्या कामासाठी पुरेसा न्याय देता येत नाही. त्याचबरोबर देवस्थान समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असल्यामुळे त्यांनाही पुरेसा वेळ नसल्यामुळे अनेक प्रश्न, दैनंदित अडचणी सोडवण्यात मर्यादा येत आहेत. शहरी भागापासून ते दुर्गम डोंगराळ परिसरात असलेल्या मंदिरांच्या, देवस्थान जमिनींच्या अनेक कामांसाठी नागरिकांना देवस्थान समिती सचिव किंवा जिल्हाधिकारी यांना वारंवार भेटावे लागते परिणामी असे महत्वाचे, निर्णयात्मक पद रिक्त असल्याने गौरसोय आणि जैसे थे परिस्थती निर्माण होऊन कोणतेही धोरणात्मक, विकासाभिमुख निर्णय घेण्यात मर्यादा येत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.